कलाविश्वात आपलं हक्काचं स्थान निर्माण करायचं असेल तर त्यासाठी केवळ रंगरुप गरजेचं नाही तर टॅलेंट महत्त्वाचं आहे हे अभिनेता इरफान खानने (Irrfan Khan) सिद्ध करुन दाखवलं. बॉलिवूडसह हॉलिवूडमध्येही आपल्या अभिनयाचा डंका वाजवणाऱ्या इरफानचं निधन होऊन आज दोन वर्ष उलटली. मात्र, त्याच्या दमदार अभिनयामुळे तो आजही प्रेक्षकांच्या स्मरणात कायम आहे. दोन वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी इरफानचं निधन झालं. त्यामुळे सध्या सोशल मीडियावर त्याच्याविषयी अनेक गोष्टी चर्चिल्या जात आहेत. यात त्याची एक जुनी मुलाखत चर्चेत आली आहे.
पठाण कुटुंबात जन्माला आलेला इरफानचं प्राण्यांवर विशेष प्रेम होतं. त्यामुळे त्याचे वडील त्याला कायम मस्करीत 'पठाणांच्या घरात ब्राह्मण जन्माला आलाय', असं म्हणायचे. एका मुलाखतीत त्याने याविषयी खुलासा केला होता.
"माझे वडील शिकारी होते. त्यामुळे ते वरचेवर जंगलात जाऊन शिकार करायचे. त्यांच्यासोबत जंगलात जाणं आम्हाला आवडायचं पण एखाद्या प्राण्याला मारताना तितक्याच वेदना व्हायच्या. एखाद्या प्राण्याला मारल्यानंतर मी कायम विचार करायचो, की आता याच्या आईचं काय झालं असेल, त्याच्या मुलांचं काय होणार. एकदा माझ्या वडिलांनी मला बंदूक चालवायला सांगितली. माझ्या त्या बंदूकीतून सुटलेल्या गोळीमुळे एक प्राणी मारलाही गेला. त्यावेळी मला प्रचंड वाईट वाटलं होतं. त्यावेळी वडिलांनी माझी खिल्ली उडवली होती. पठाणांच्या घरी हा ब्राह्मण कसा काय जन्माला आला? असं त्यांनी मस्करीत म्हटलं होतं", असं इरफानने सांगितलं.
दरम्यान, इरफान खानचं २९ एप्रिल २०२० मध्ये निधन झालं. गेल्या कित्येक वर्षांपासून तो दीर्घ आजाराशी लढा देत होता. मात्र, मुंबईतील कोकिलाबेन रुग्णालयात त्याने अखेरचा श्वास घेतला. इरफानने त्याच्या करिअरमध्ये अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये काम केलं आहे.