Join us

इरफान खानने आजारपणात लिहिले होते हे भावुक पत्र, मृत्यूची त्याला वाटायला लागली होती भीती

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2020 4:09 PM

आजाराच्या वेदना, कुटुंबीयांची काळजी, मनातील घालमेल व्यक्त करणारे हे पत्र वाचकांना भावूक करणारे होते.

ठळक मुद्देकर्करोगाशी झुंज देत असताना इरफानने एका पत्राच्या माध्यमातून आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली होती. अनिश्चिततेमध्येच निश्चितता असते असे या पत्रात इरफानने म्हटले होते.

आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या इरफान खानचे नुकतेच निधन झाले. त्याच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. इरफानला केवळ भारतातच नव्हे तर जगभर फॅन फॉलोव्हिंग होते. इरफानचे निधन मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात झाले. 

कर्करोगाशी झुंज देत असताना इरफानने एका पत्राच्या माध्यमातून आपल्या मनातील भावनांना मोकळी वाट करून दिली होती. अनिश्चिततेमध्येच निश्चितता असते असे या पत्रात इरफानने म्हटले होते. आजाराच्या वेदना, कुटुंबीयांची काळजी, मनातील घालमेल व्यक्त करणारे हे पत्र वाचकांना भावूक करणारे होते. टाइम्स ऑफ इंडियाला लिहिलेल्या पत्रात इरफानने म्हटले होते की, मला हाई-ग्रेड न्यूरोएंडोक्राइन कॅन्सरचे निदान होऊन आता काही काळ लोटला आहे. या आजारामुळे माझ्या शब्दकोशात एका नव्या शब्दाची भर पडली आहे. हा एक दुर्मीळ आजार असून, त्याबाबत फारच कमी माहिती उपलब्ध आहे. त्यामुळे त्यावर इलाज होण्याची शक्यताही कमी होती. म्हणूनच सध्या मी एका प्रयोगाचा भाग बनलो आहे.

मी एका वेगळ्यात खेळात अडकलो आहे. तेव्हा मी एका वेगाने जाणाऱ्या ट्रेनमधून प्रवास करत होतो. तिथे माझी स्वप्नं होती, योजना होत्या, महत्त्वाकांक्षा होत्या, उद्दिष्टं होती. मात्र या सर्वांच्या पसाऱ्यात मी विस्कळीत झालो होतो. तेवढ्यात कुणीतरी माझ्या खांद्यावर थाप मारली. तो टीसी होता त्याने माझा मुक्काम आल्याचे मला सांगितले. मी गोंधळलो. हा माझा मुक्काम नाही, असे त्याला सांगितले. मात्र हेच तुझ्या मुक्कामाचे ठिकाण आहे असे तो म्हणाला. या अनपेक्षित घटनेने मला माझ्या मर्यादा कळल्या. तुम्ही विशाल समुद्रात तरंगणाऱ्या एका लहानशा माशाप्रमाणे असता आणि त्याला नियंत्रित करण्यासाठी बैचेन असता, हे त्या अनपेक्षित धक्क्याने मला कळले. 

मनातील ही उलथापालथ, भीती, आश्चर्य या सगळ्यांमध्ये मी माझ्या मुलाला सांगत होतो की, या क्षणी मला हिंमत ठेवून या परिस्थितीचा सामना करायचा आहे. भीतीला माझ्यावर वरचढ होऊ देता कामा नये. अचानक वेदनेची लहर अंगभर संचारली. त्यावेळी मी कुठलेही काम करत नव्हतो. कुठलीही सांत्वना वा प्रेरणा माझ्याजवळ नव्हती. त्यावेळी एकच गोष्ट माझ्यासमोर होती, ती म्हणजे वेदना. जी त्याक्षणी मला परमेश्वरापेक्षाही मोठी भासू लागली. मी जसा हॉस्पिटलच्या आत चाललो होतो, तसा तसा संपत होतो. कमकुवत पडत होतो. उदास होऊ लागलो होतो.

मी उपचार घेत असलेले रुग्णालय लॉर्डस मैदानाच्या विरुद्ध दिशेला आहे, याची मला कल्पना नव्हती. वेदनेने कळवळत असतानाच मी व्हिवियन रिचर्डसचे पोस्टर पाहिले. पण माझ्या मनात काहीच भावभावना नव्हत्या. कारण मी जगापासून तुटलो होतो. रुग्णालयात माझ्या वॉर्डच्या बरोब्बर वरच्या बाजूला कोमा वॉर्ड होता. एकदा रुग्णालयातील खिडकीमध्ये उभा होतो आणि मनात विचित्र भावना होत्या. त्या विचित्र स्थितीने मला व्यापून टाकले होते. जीवन आणि मृत्यू यांच्यामध्ये केवळ हा एक रस्ता आहे. ज्याच्या एकीकडे रुग्णालय आहे आणि पलीकडे लॉर्ड्स स्टेडियम.

माझ्याकडे आता केवळ ईश्वरी शक्ती आणि समजुतदारपणाचा ठेवा आहे. माझ्या रुग्णालयाचे ठिकाणही मला त्रस्त करत आहे. जगात केवळ एकच गोष्ट निश्चित आहे ती म्हणजे अनिश्चितता. आता माझ्यातील संपूर्ण शक्तीचा अनुभव घेऊन आपली लढाई पूर्ण शक्तीनिशी लढणे, एवढेच माझ्या हातात आहे. या वास्तवाची जाणीव झाल्यानंतर मी परिणामांची चिंता न करता विश्वासाने शरणागती पत्करली आहे. आता पुढच्या आठ महिन्यांनंतर, चार महिन्यांनंतर किंवा दोन वर्षांनंतर आयुष्य मला कुठे घेऊन जाईल, हे मला ठावूक नाही. आता माझ्या डोक्यात कुठल्याही गोष्टीची चिंता राहिलेली नाही. मी सर्व चिंतांना मागे सोडून आलो आहे.

पहिल्यांदाच मी खऱ्या अर्थाने स्वातंत्र्याचा अनुभव घेतला आहे. ही बाब मला मोठ्या यशासारखी वाटत आहे. ईश्वरावरील माझा विश्वास अधिकच दृढ झाला आहे. तो माझ्या शरीरातील कणाकणात वसल्याचे मला जाणवत आहे. आता पुढे काय होईल हे येणारा काळच सांगेल. पण सध्या तरी मला असेच वाटत आहे. माझ्या संपूर्ण जीवनात लोकांनी माझे चांगलेच चिंतीले आहे. माझ्यासाठी प्रार्थना केली. मग मी त्यांना ओखळत असेन वा नसेन. ते सर्व वेगवेगळ्या ठिकाणी प्रार्थना करत होते. मात्र त्यांच्या सर्वांच्या सदिच्छा एकत्र आल्या. त्यामध्ये पाण्याच्या एखाद्या वेगवान प्रवासारखीच ताकद होती. या प्रार्थनांमुळे माझ्यामध्ये आनंद आणि उत्सुकता निर्माण झाली.

टॅग्स :इरफान खान