आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणारा इरफान खान (Irrfan Khan) आज आपल्यात नाही. एक वर्षापूर्वी आजच्याच दिवशी इरफान हे जग सोडून गेला. त्याच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला होता. आजही इरफान या जगात नाही, यावर विश्वास बसत नाही. आज त्याची पहिली डेथ अॅनिव्हर्सरी. (Irrfan Khan First Death Anniversary : )
अशी होती इरफानची लव्हस्टोरी... इरफान व त्याची पत्नी सुतापा सिकदरची (Sutapa Sikdar ) लव्हस्टोरी दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून सुरु झाली होती. सुतापाच्या प्रेमात इरफान इतका वेडा झाला होता की, अगदी तिच्यासाठी हिंदू धर्म स्वीकारायलाही तो तयार होता.
सुतापाची ही मुळची आसामची. दिल्लीत दोघेही नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामध्ये दाखल झाले आणि दोघांची मैत्री झाली. पुढे अॅक्टिंगचे बारकावे शिकत असताना दोघेही कधी एकमेकांच्या प्रेमात पडले, ते त्यांनाही कळले नाही.त्या काळात लिव्ह इनबद्दल लोक बोलायलाही घाबरत, अशा काळात लग्नाआधी इरफान व सुतापाच्या आयुष्यात तिस-याची चाहुल लागली आणि दोघांनी एका खोलीचे घर सोडून दोन खोल्यांचे घर घेण्याचा निर्णय घेतला. पण घर शोधायला गेले की, तुम्ही विवाहित आहात का? असा एकच प्रश्न दोघांना विचारला जाई. नाही, असे उत्तर दिल्यावर घर देण्यास नकार मिळायचा. यानंतर इरफान व सुतापा यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला.
तुझे कुटुंब लग्नासाठी तयार झाले नाहीत तर मी हिंदू धर्म स्वीकारायलाही तयार आहे, असे इरफानने सुतापाला सांगितले होते. पण त्याची गरजच पडली नाही. सुतापाच्या कुटुंबाने इरफानला आहे तसे स्वीकारले आणि दोघांचे लग्न झाले.
एका मुलाखतीत इरफानने सांगितले होते की, सुतापा माझ्या कामावर अगदी बारकाईने लक्ष ठेवायची. ती नसती तर ना मला हॉलिवूडचे सिनेमे मिळाले असते, ना माझ्याकडे स्वत:चे घर असते. माझ्याकडे काम नसताना तिने घराची सर्व जबाबदारी उचलली होती. मी आज जे काही आहे, फक्त तिच्यामुळे आहे.पडद्यावर गंभीर दिसणारा इरफान ख-या आयुष्यात अगदी मस्तमौला आणि विनोदी व्यक्ती होता. एक उत्तम पती असण्यासोबतच एका उत्तम पित्याची जबाबदारीही त्याने निभवली.
इरफान लहान असताना त्याला अभिनयात नव्हे तर खेळात रस होता. त्यामुळे तो घरच्या व्यवसायाकडे लक्ष देत नव्हता. पण खेळात करियर केल्यास घरातील लोक पाठिंबा देणार नाहीत याची त्याला कल्पना होती. तो जयपूरमध्ये एमए करत असताना त्याला अचानक दिल्लीतील प्रसिद्ध नॅशनल स्कूल आॅफ ड्रामाची स्कॉलरशिप मिळाली आणि त्याच्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली.
सुतापाने इरफानच्या करियरच्या सुरुवातीला त्याच्यासोबत एक टेलिफिल्म बनवली होती. हीच टेलिफिल्म पाहून त्याला गोविंद निहलानी यांनी अभिनयक्षेत्रात संधी दिली. इरफान आणि सुतापाने करियरच्या सुरुवातीला अनेकवेळा एकत्र काम केले. बनेगी अपनी बात या मालिकेची लेखिका सुतापा होती तर या मालिकेत इरफानने महत्त्वाची भूमिका साकारली होती.