आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या इरफान खानचे नुकतेच निधन झाले. त्याच्या निधनाने सगळ्यांनाच धक्का बसला आहे. इरफानला केवळ भारतातच नव्हे तर जगभर फॅन फॉलोव्हिंग होते. इरफानचे निधन मुंबईतील कोकीळाबेन रुग्णालयात झाले. इरफान अंधेरी येथे त्याच्या पत्नी आणि मुलासोबत राहात होते. त्याने अंधेरी येथील घर काहीच महिन्यांपूर्वी घेतले होते. त्याआधी तो मढ आयलँडमध्ये राहात होता.
इरफानने त्याच्या कारकिर्दीची सुरुवात छोट्या पडद्यापासून केली होती. त्याने त्याच्या कारकिर्दीच्या सुरुवातीला चाणक्य, भारत एक खोज, बनेगी अपनी बात, चंद्रकांता यांसारख्या अनेक मालिकांमध्ये काम केले होते. बनेगी अपनी बात या मालिकेत तो नायकाच्या वडिलांच्या भूमिकेत झळकला होता. त्यावेळी त्याच्या आणि नायकाच्या वयाच्या अंतरात जास्त फरक नव्हता. या मालिकेत नायकापेक्षा इरफानची भूमिका अधिक गाजली होती. आज या मालिकेला अनेक वर्षं झाले असले तरी या मालिकेतील इरफानची भूमिका प्रेक्षकांच्या चांगलीच लक्षात आहे. अनेक मालिकांमध्ये काम केल्यानंतर इरफानने एक डॉक्टर की मौत, सच अ लाँग जर्नी यांसारख्या चित्रपटांमध्ये काम केले. पण त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मकबूलमधील भूमिकेमुळे मिळाली.
इरफानने पिकू, पान सिंग तोमर, द लंचबॉक्स यांसारख्या बॉलिवूडच्या चित्रपटात एकापेक्षा एक दर्जेदार भूमिका साकारल्या होत्या. तसेच लाइफ ऑफ पाय, ज्युरॅसिक वर्ल्ड यांसारख्या हॉलिवूड चित्रपटातही तो अतिशय महत्त्वाच्या भूमिकेत झळकला होता. इन्फर्नो या टॉम हँक्स यांच्या चित्रपटात इरफान प्रमुख भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळाला होता.