आपण जे काही करतो ते फिरून पुन्हा आपल्याकडे येतंच, असं जुनीजाणती माणसं सांगतात. याच विचारावर आधारित, समीक्षकांनी नावाजलेला ब्लॅकमेल हा सिनेमा शनिवार १८ ऑगस्ट रोजी रात्री ८ वाजता सोनी मॅक्स या वाहिनीवर वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमिअरसाठी सज्ज आहे. मानवी स्वभाव म्हणजे काळं-पांढरं नव्हे. प्रत्येकामध्ये या सगळ्याचं मिश्रण असतं. या सिनेमात मानवी स्वभावाचे हे रंग अगदी ठळकपणे मांडण्यात आले आहेत.
अगदी अनोख्या कथा रुपेरी पडद्यावर आणण्यासाठी ओळखल्या जाणाऱ्या दिग्दर्शक अभिनय देव यांनी या वेगळ्या धाटणीच्या तरीही व्यावसायिक पद्धतीच्या सिनेमातून आपल्या क्षमता आणि आपली वैशिष्ट्ये पुन्हा एकदा दाखवून दिली आहेत. सिनेसृष्टीतून आणि समीक्षकांची वाहवा मिळवलेल्या ब्लॅकमेलमध्ये इरफान खान, दिव्या दत्ता, क्रीती कुलहारी, अरुणोदय सिंग, ओमी वैद्य असे अनेक प्रतिभावान कलाकार आहेत.
ही कथा आहे इरफान खानने रंगवलेल्या देव या मध्यमवर्गीय माणसाची. संपत चाललेली नोकरी आणि प्रेम संपलेलं वैवाहिक जीवन अशा कात्रीत तो सापडला आहे. ऑफिसमध्ये कॉर्पोरेट गुलाम बनून राबणारा देव रात्री उशीरा घरी आल्यावरही त्याला भेटणार असते अलिप्त राहणाऱ्या पत्नी आणि मायक्रोव्हवमध्ये गरम होणारं जेवण. मात्र, एकदा तो पत्नीला आश्चर्याचा धक्का देण्याचं ठेवतो. पण, प्रत्यक्षात त्याला आयुष्यभर पुरेल असा धक्का बसतो. घरी आल्यावर तो बेडरूमध्ये पत्नी आणि तिचा प्रियकर रंजीत (अरुणोदय सिंग) दिसतात. या प्रसंगात देव नेहमीच्या बॉलिवtड पतींप्रमाणे वागत नाही. तो जरा वेगळा विचार करतो… तो पत्नीच्या प्रियकराला ब्लॅकमेल करू लागतो. त्यानंतर सुरू होते एकात एक गुंफलेली ब्लॅकमेलिंगची साखळी. देव रंजितला ब्लॅकमेल करू लागतो. मात्र, नंतर त्यालाही ब्लॅकमेलिंगचे फोन येऊ लागतात. अनावधाने त्याच्या मित्राला हे कळतं. त्यानंतर यातील प्रत्येक व्यक्तिरेखेला फसवणुकीच्या पैशातला वाटा हवा असतो. पैसा कोणालाच मिळत नाही, फक्त एका हातातून दुसऱ्या हातात जात राहतो.