इरफान खानचा हिंदी मीडियम हा चित्रपट चांगलाच गाजला होता. या चित्रपटाचा विषय हा आजवरच्या चित्रपटांपेक्षा खूप वेगळा असला तरी प्रेक्षकांना तो आपलासा वाटला होता. या चित्रपटात देशाच्या शिक्षण व्यवस्थेवर आणि मुलांना शाळेत प्रवेश देण्यासाठी केला जाणारा गैरव्यवहार यावर भाष्य करण्यात आले होते. हा चित्रपट प्रेक्षकांना प्रचंड आवडला होता. त्याचमुळे या चित्रपटाचा दुसरा भाग आपल्याला लवकरच पाहायला मिळणार आहे.
हिंदी मीडियम या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत असलेला इरफान खान गेल्या कित्येक महिन्यांपासून लंडनमध्ये न्युरोएंडोक्राईन कॅन्सर या आजारावर उपचार घेत होता. पण गेल्या काही दिवसांपूर्वी तो मुंबईत परतला आहे. मुंबईत परतल्यानंतर आता काहीच दिवसांत इरफान ‘हिंदी मीडियम २’च्या शूटींगला सुरुवात करणार असल्याचे म्हटले जात आहे. डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यात हे शूटींग सुरू होईल, असे कळतेय. ‘हिंदी मीडियम’चे मेकर्स इरफानला भेटायला लंडनमध्ये गेले होते. तेथे त्यांनी इरफानला ‘हिंदी मीडियम २’ची स्क्रिप्ट ऐकवली होती. ही स्क्रिप्ट आवडल्यामुळे इरफानने त्यात काम करण्यास होकार दिला होता. या नव्या चित्रपटाचे नाव हिंदी मीडियम 2 नसणार असल्याचे वृत्त टाईम्स ऑफ इंडियाने दिले आहे. त्यांनी त्यांच्या बातमीत म्हटले आहे की, या चित्रपटाचे नाव इंग्लिश मीडियम असणार असून या चित्रपटात इरफानची मुलगी शिकण्यासाठी अमेरिकेला जाते आणि तिथे तिला कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागते हे आपल्याला पाहायला मिळणार आहे.
‘हिंदी मीडियम’ चित्रपटातील इरफानच्या अभिनयाचे प्रचंड कौतुक झाले होते. पाकिस्तानी अभिनेत्री सबा कामर यात इरफानसोबत मुख्य भूमिकेत होती. भारत आणि चीन या दोन्ही देशात या चित्रपटाने बक्कळ कमाई केली होती.
इरफानच्या कॅन्सरचे निदान होण्यापूर्वीच म्हणजेच, फेब्रुवारी २०१८ मध्येच ‘हिंदी मीडियम’च्या सिक्वलची घोषणा झाली होती. होमी अदजानिया हा चित्रपट दिग्दर्शित करणार असेही जाहीर करण्यात आले होते. पण इरफानच्या प्रकृतीमुळे हा चित्रपट लांबणीवर टाकण्यात आला होता. त्यानंतर मेकर्सनी इरफारनकडे या चित्रपटाचा विषयही काढला नव्हता. पण इरफानच्या प्रकृतीत काहीशी सुधारणा होताच, मेकर्सनी त्याची भेट घेतली.