गेले काही दिवस न्यूरो इंडोक्राईन ट्यूमरसारख्या दुर्धर आजाराशी सामना करणाऱ्या अभिनेता इरफान खानच्या तब्येतीत आता सुधारणा होत आहे. डॉक्टरांच्या उपचारांना यश येत असून लवकरच इरफान भारतात परत येणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. या गंभीर आजारातून पूर्णपणे बाहेर पडल्यानंतर तो सिनेमात पुनरागमन करणार असल्याचे खुद्द इरफानने स्पष्ट केले आहे.
सध्या अनेक जणांना कर्करोगासारख्या गंभीर आजाराला सामोरे जावे लागत आहे. बॉलिवूडचे मनिषा कोइराला, अनूराग बसू यांसारख्या कलाकारांनी कर्करोगावर मात करून आयुष्याची सेकेंड इनिंग सुरू केली आहे. त्याचप्रमाणे इरफानने देखील त्याच्या आजारावर मात करून आता त्याच्या आयुष्यातील सेकेंड इनिंगची सुरूवात करणार आहे. त्याचा सहावा किमो यशस्वी पार पडल्यानंतर त्याने चित्रपटात काम करण्याचा निर्णय घेतला आहे आणि एक चित्रपट स्वीकारला आहे. लंडनमधून भारतात परतल्यावर इरफान सगळ्यात आधी हिंदी मीडियम या सिनेमाच्या सिक्वलमध्ये काम करणार असल्याचे इरफानने स्पष्ट केले आहे. इरफानच्या या निर्णयामुळे त्याच्या चाहत्यांना दिलासा मिळाला आहे.
गेल्या अनेक महिन्यांपासून इरफान अमेरिकेत कर्करोगावर उपचार घेत आहे. तिसऱ्या केमोनंतर इरफानच्या प्रकृतीत सुधारणा दिसून येत आहे. सहा केमोथेरपी झाल्यावर पुन्हा एकदा कर्करोगाच्या सर्व चाचण्या करण्यात येतील. नुकत्याच एका मुलाखतीत इरफान म्हणाला की, भविष्याची कोणतीही काळजी न करता आणि कोणत्याही योजना न आखता मुक्तपणे जगण्यास सध्या मी प्राधान्य देत आहे. माझ्या या आजारामुळे मृत्यू मला कधीही कवटाळू शकतो असेही त्याने यावेळी म्हटले.