'अंग्रेजी मीडियम' या सिनेमाच्या माध्यमातून इरफान खान बऱ्याच काळानंतर रुपेरी पडद्यावर झळकला होता. इरफानचा अभिनय आधीसारखाच प्रभावी आणि दमदार होता. 'अंग्रेजी मिडीयम' सिनेमात आपल्या अभिनयाने इरफानने साकारलेला चंपक कधी हसवतो, रडवतो, कधी भावनिक करतो तर कधी रसिकांचं तुफान मनोरंजनही करतो. सिनेमात त्याच्या मुलीची भूमिका अभिनेत्री राधिका मदानने साकारली होती.
'अंग्रेजी मीडियम' हा इरफान खानचा अखेरचा सिनेमा ठरला. वयाच्या 54 व्या वर्षी निधन झाले. गेल्या आठवड्याभरापासून आयसीयूत त्याच्यावर उपचार सुरु होते. पण आज अखेर त्याची प्राणज्योत मालवली. बॉलिवूडचा हा प्रतिभावंत कलाकार असा अचानक निघून गेल्याने चाहते आणि बॉलिवूडकर यांना मोठा धक्का बसला आहे. अनेकांनी इरफानसह असलेल्या आपल्या आठवणी शेअर केल्या आहेत. यात इरफानची ऑनस्क्रीन मुलगी राधिका मदानने देखील निधनाची बातमी वाचताच भावूक झाली. राधिकाने म्हटले की, अंग्रेजी मीडियाच्या शूटिंगदरम्यान त्यांना इतक्या मोठ्या आजाराने ग्रासले आहे. हे आम्हाला कधीच जाणवूदेखील दिले नाही.
इरफान खान यांच्याकडून नेहमीच मला प्रेरणा मिळाली, ते लढवय्ये होते ,“नेमकं काय म्हणायचं ते मला समजत नाहीय. हे लिहीत असताना मला मनातून प्रचंड दु:ख होत आहे. मला माहितीय त्याप्रमाणे इरफान खान हा एक खंबीर, लढवय्या माणूस होता. या आयुष्यात माझी त्यांच्याबरोबर भेट झाली, हे माझं नशीब आहे. ते नेहमीच अनेकांसाठी प्रेरणास्त्रोत राहतील.