लक्ष्मण उतेकर दिग्दर्शित 'छावा' (Chhaava) या चित्रपटाची सध्या सगळीकडेच चर्चा सुरु आहे. या चित्रपटात दाखवण्यात आलेली भव्यता ही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. 'छावा' पाहण्यासाठी थिएटरमध्ये प्रेक्षकांची हाऊसफुल्ल गर्दी पाहायला मिळतेय. 'छावा'मध्ये छत्रपती संभाजी महाराजांच्या शूर पराक्रमाची गाथा मांडण्यात आली आहे. विकी कौशल हा छत्रपती संभाजी महाराजांच्या भुमिकेत इतिहास जिवंत करताना दिसतोय. त्याच्या अभिनयाचं प्रचंड कौतुक होत आहे. तर रश्मिका महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत आहे. तर औरंगजेबाच्या भूमिकेत अक्षय खन्ना आहे. या चित्रपटातील सगळेच कलाकार हे चर्चेत आहेत. यासोबतच चित्रपटातील डॉयलॉगही ही प्रेक्षकांच्या हृदयाला भिडले आहेत.
तुम्हाला माहितीये का की 'छावा' सिनेमातील काव्यात्मक डॉयलॉग हे मुस्लिम लेखकानं लिहले आहेत. हे ऐकून तुम्हाला आश्चर्य झालं असेल पण हो हे खरं असून इरशाद कामिल यांनीलिहिले आहेच. याविषयी स्वत: इरशाद कामिल यांनी सांगितलं आहे. गीतकार इरशाद कामिल यांनी अलीकडेच मिड डेला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी 'छावा' चित्रपटातील काव्यात्मक संवाद लिहिण्यासाठी कोणतेही शुल्क आकारले नसल्याचेही उघड केले.
ते म्हणाले, "गाण्यांव्यतिरिक्त, मी चित्रपटाचे काव्यात्मक संवाद लिहिण्यातही सहभागी झालो आहे. संभाजी महाराजांबद्दल असलेल्या आदरामुळे, मी त्यांच्याबद्दल लिहिण्यासाठी एक पैसाही घेतला नाही. आपण निदान एवढे तरी करू शकतो". पुढे ते म्हणाले, "संभाजी महाराज माझ्यासाठी केवळ एक ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व नाहीत, तर ते प्रेरणादायी आहेत. त्यांच्या आयुष्याचा अभ्यास करत संवाद लिहिणे हा माझ्यासाठी एक अभिमानास्पद अनुभव होता. छत्रपती संभाजी महाराज यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मी यासाठी कोणतेही मानधन स्वीकारलं नाही," असे इरशाद कामिल यांनी सांगितले. इरशाद कामिल यांच्यासोबतच सिनेमातील काही डॉयलॉग ऋषि वीरवानी यांनीही लिहलेले आहेत. सिनेमातील जबरदस्त डॉयलॉग ऐकताना अंगावर शहारे येतात.