प्रसिद्ध दिग्दर्शक ओम राऊत (Om raut) सध्या त्याच्या 'आदिपुरुष' (adipurush) या सिनेमामुळे चर्चेत येत आहे. हा सिनेमा प्रदर्शित होण्यापूर्वी प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. मात्र, सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांच्या अपेक्षांवर पाणी पडलं. सिनेमातील संवाद, व्हिफक्स, कलाकारांचे कपडे यावर नेटकरी टीकास्त्र डागत आहेत. यामध्येच अनेकांनी दिग्दर्शक ओम राऊत यांच्यावरही ताशेरे ओढले आहेत. ओम राऊत यांचं मेकिंग फसलं आहे, असं म्हटलं जात आहे. यावर अभिनेता शशांक केतकर (Shashank Ketkar) याने त्याचं मत मांडलं आहे.
'होणार सून मी या घरची' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे शशांक केतकर. उत्तम अभिनयशैली आणि पर्सनालिटी यामुळे चर्चेत येणाऱ्या शशांकने अलिकडेच 'लोकमत ऑनलाइन'ला मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने आदिपुरुष सिनेमाविषयी भाष्य केलं.
'ओम राऊत यांचं सिनेमाचं मेकिंग फसलंय का?' असा प्रश्न शशांकला विचारण्यात आला. त्यावर, "अजिबात नाही मी असं बिल्कूल म्हणणार नाही. कारण, सिनेमा कसा करावा हा प्रत्येकाचा टेक असतो. ऐतिहासिक सिनेमा म्हणा किंवा धार्मिक सिनेमा म्हणा प्रत्येकाचा टेक असतो. कारण, आपण कायम त्यांना (देवाला) मुर्तरुपात पाहिलंय. खरोखर प्रत्यक्षात कोणीच देवादिकांना पाहिलेलं नाही. त्यामुळे त्यांना पडद्यावर कसं सादर करायचा हा आपआपला टेक असतो. जसं, जोधा अकबर सिनेमात जसा खराखुरा अकबर होता तसा दाखवलेला नाही. त्याच्याजागी सिक्सपॅक अॅब्ज असलेला हृतिक रोशनला घेतलं. तसाच हा प्रकार आहे. तुम्ही स्वातंत्र्य घ्या पण त्यालाही काही मर्यादा आहेत", असं शशांक केतकर म्हणाला.
पुढे तो म्हणतो, "आणि मला नाही वाटत ओम राऊत, प्रसाद सुतार यांसारखे लोक मुद्दाम पैसे मिळालेत म्हणून घाणेरडा सिनेमा करुयात असा विचार करुन सिनेमा करतील. त्यांनी काही तरी अभ्यास केला असेलच ना. मुंतशिर यांनीही सिनेमात संवाद लिहिले म्हणजे त्यामागे काही तरी कारण असेल." दरम्यान, शशांकने सोशल मीडियावर आदिपुरुष संदर्भात पोस्ट केल्यानंतर मोठ्या चर्चेला उधाण आलं. अनेकांनी त्याच्या पोस्टशी सहमती दर्शवली आहे.