डॉन , कृष्णा कॉटेज यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखली जाणारी बॉलिवूडची खल्लास गर्ल ईशा कोप्पीकर सुमारे १८ वर्षांनंतर साऊथ इंडस्ट्रीत कमबॅक करतेय. नरसिम्मा हा ईशाचा शेवटचा साऊथ चित्रपटात होता. पण आता अभिनेता शिवकार्तिकेयच्या आगामी चित्रपटात ईशा एका महत्त्वपूर्ण भूमिकेत झळकणार आहे. हा सायन्स फिक्शन सिनेमा एलियनवर आधारित आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने ईशाने एक मुलाखत दिली आणि या मुलाखतीत साऊथ मेगास्टार रजनीकांत आणि अजित कुमार यांच्याबद्दल बोलून फसली. मग काय, लोकांनी ईशाला प्रचंड ट्रोल करणे सुरु केले.अजित कुमार व रजनीकांत हे दोन्ही सुपरस्टार साऊथच्या चाहत्यांच्या गळ्यांतील ताईत आहेत. ताज्या मुलाखतीत ईशाला या दोघांबद्दल विचारण्यात आले. पण हे काय, अजित सध्या इंडस्ट्रीत आहे की नाही, ते मला ठाऊक नाही, असे सांगून ईशाने स्वत:च वाद ओढवून घेतला.
मी अजित कुमार यांची चाहती आहे. पण ते आता इंडस्ट्रीत काम करतात की नाही, हे मला ठाऊक नाही,असे ती म्हणाली. ईशाचे शब्द ऐकून अजित कुमारने चाहते भडकले नसतील तर नवल. या भडकलेल्या चाहत्यांनी ईशाला चांगलेच फैलावर घेतले. तुला साऊथ इंडस्ट्रीबद्दल माहित नाही तर इथे काम करायला का आलीस? असा खोचक प्रश्न अनेकांनी यानंतर तिला केला.