अभिनेता आर. माधवन लवकरच ‘रॉकेट्री-द नंबी इफेक्ट’ या चित्रपटात मुख्य भूमिका साकारत आहे. विशेष म्हणजे याचे दिग्दर्शनही तो करीत आहे. गेली काही दिवस याचे शूटींग सुरू आहे. नुकताच त्याचा एक फोटो सोशल मीडियामध्ये झळकला आहे. यात तो शास्त्रज्ञ नंबी नारायण यांच्यासोबत दिसत आहे. दोघांच्याकडे पाहिले तर खरे नंबी नारायण कोण असा प्रश्न पडावा इतके त्याच्या लूकमध्ये सारखेपणा आहे.
‘रॉकेट्री-द नंबी इफेक्ट’ हा चित्रपट वैज्ञानिक नंबी नारायणन यांच्या जीवनावर आधारित आहे. ते इस्रोमधील वरिष्ठ शास्त्रज्ञ आणि अधिकारी होते. हेरगिरी केल्याच्या खोट्या आरोपाखाली १९९४ मध्ये त्यांना अटक करण्यात आली होती. परंतु त्यांच्यावरचे हे सर्व आरोप खोटे ठरले आणि त्यांना निर्दोष ठरवण्यात आले.
चित्रपटाबद्दल बोलताना माधवन म्हणाला होता, ‘हा चित्रपट माझ्यासाठी फार महत्त्वाचा आहे. तीन वर्षापूर्वी अनंत महादेवनने नंबी नारायण यांची गोष्ट सांगितली होती. खोट्या आरोपाखाली अन्याय होऊन तुरुंगात गेलेल्या व्यक्तीची ही गोष्ट असावी, असे मला वाटत होते. त्यानंतर मी लिहायाला सुरुवात केली आणि मला स्क्रिप्ट पूर्ण करायला सात महिने लागले. चित्रपटासंबंधी मी जेव्हा त्यांना भेटलो तेव्हा त्यांनी त्यांच्या योगदानाबद्दल बोलले नाहीत पण मी त्यांना बोलते करायचा प्रयत्न केला तेव्हा मला लक्षात आले की माझ्या स्क्रिप्टमधून मी अन्याय करतोय. कारण मी स्क्रिप्टमध्ये केवळ त्यांच्या केसबद्दल लिहिले होते. यासाठी मला सात महिने लागले होते. मी ती स्क्रिप्ट फेकून दिली आणि अनंत महादेवन आणि इतर लेखकांच्यासोबत दिड वर्षे ही स्क्रिप्ट लिहिली. मला खात्री आहे की, देशातील ९५ टक्के लोकांना नंबी नारायण यांच्याबद्दल माहिती नसणार आणि हा एक गुन्हा आहे, असे मला वाटते. जे पाच टक्के लोक त्यांना ओळखतात त्यांनाही त्यांची पूर्ण गोष्ट माहिती नसणार.’ 'रॉकेट्री-द नंबी इफेक्ट' हा चित्रपट हिंदी, इंग्रजी, तामिळ आणि मळ्यालम भाषेत प्रदर्शित होईल.