बॉलिवूडच्या मोठ्या पडद्यावरील अभियनाचा महानायक बिग बी अमिताभ बच्चन म्हणजे बॉलिवूडला समृद्ध करणारा काळ. अमिताभ बच्चन यांच्यावर प्रेम करणारी पिढी मुलगा, वडिल आणि नातू या तिन्ही प्रकारांत पाहायला मिळते. कारण, तीन पिढ्यांच्या तरुणाईवर अमिताभ यांच्या अभियनाने, त्यांच्या संवादाने राज्य केलं. अनेक चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्या आईंची भूमिका निभावणाऱ्या ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना दिदींचे आज निधन झाले. त्यानिमित्ताने त्यांच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळत आहे. लोकमतने सुलोचना दिदींची मुलाखत घेतली होती, त्यावेळी त्यांनी चित्रपटसृष्टीतील प्रवास, मराठी कलाकार, बॉलिवूड आणि अमिताभ बच्चन यांच्यासोबतच्या आठवणही जागवल्या होत्या.
ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना लाटकर ह्या मनोरंजन जगतात आणि चाहत्यांमध्ये सुलोचना दीदी या नावाने परिचित होत्या. त्यांनी मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप पाडली होती. त्यांनी २५० हून अधिक चित्रपटांमध्ये अभिनय केला होता. सुरुवातीच्या काळामध्ये सुलोचना यांना भालजी पेंढारकर यांचं मार्गदर्शन लाभलं होतं. तसेच त्यांनी गेली अनेक दशके आपल्या अभिनयाच्या बळावर सिनेसृष्टीत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. बिग अमिताभ यांची अभिनयाची जडणघडणही त्यांच्यासमक्षच झाली. विशेष म्हणजे अनेक चित्रपटांत त्यांनी अमिताभ यांच्या आईची भूमिका पार पाडलीय. रेश्मा और शेरा, मजबूर, मुकद्दर का सिकंदर या सिनेमात त्यांनी अमिताभ यांच्या आईची भूमिका निभावली होती.
यासंदर्भात त्यांना लोकमतच्या मुलाखतीत विचारणा केली असता, अमिताभ यांच्या अभिनयाची जडणघडण माझ्यासमोरच झाल्याचं त्यांनी म्हटलं. तसेच, अमिताभ एकदम लहान आणि शरीराने अशक्त होता. त्यामुळे, अनेकजण म्हणायचे हा कोण आहे, कुठून धरुन आणलंय याला. पण, मी म्हणायचे, तुम्ही पाहा एक दिवसा हा खूप मोठा कलाकार होणार आहे, असे भाकितच सुलोचना दिदींनी केलं होतं. अखेर ते भाकीत खरं ठरलं. अशी आठवण सुलोचना दिदींनी लोकमतच्या मुलाखतीत सांगितली होती. तसेच रेश्मा और शेरा चित्रपटाच्या आठवणीही सांगितल्या.दरम्यान, मनोरंजन सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री सुलोचना यांचं प्रदीर्घ आजाराने आज निधन झालं. त्या ९४ वर्षांच्या होत्या. सुलोचनादीदी यांना ९ मे रोजी सुश्रुशा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या श्वसनाच्या आजारावर उपचार सुरू होते. दरम्यान, काल रात्रीपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. दरम्यान, आज संध्याकाळी सहाच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.