या कारणामुळे ‘इत्तेफाक’चा होणार ‘टीव्ही प्रीमिअर’!
By ऑनलाइन लोकमत | Published: April 24, 2018 4:40 AM
एका सीबीआय अधिकाऱ्याकडे एक दुहेरी खुनाची केस सोपविण्यात येते.यात जे दोन साक्षीदार असतात,तेच दोन प्रमुख संशयितही असतात.या अधिकाऱ्यासमोर या ...
एका सीबीआय अधिकाऱ्याकडे एक दुहेरी खुनाची केस सोपविण्यात येते.यात जे दोन साक्षीदार असतात,तेच दोन प्रमुख संशयितही असतात.या अधिकाऱ्यासमोर या दोघेही आपापली कथा सांगतात आणि त्यातून खरा खुनी कोण ते शोधून काढण्याचे आव्हान या अधिकाऱ्यापुढे उभे राहते.यानंतर खऱ्या खुनाच्या शोधाचा जो लपंडाव सुरू होतो, त्याची कथा म्हणजेच ‘इत्तेफाक’. ‘ब्लॉकबस्टर चित्रपटांचे चॅनल’ असलेल्या ‘झी सिनेमा’ वाहिनीवर रविवार, 29 एप्रिल रोजी दुपारी 12.00 वाजता ‘इत्तेफाक’ या गूढ थरारपटाचा ‘जागतिक टीव्ही प्रीमिअर’ प्रसारित केला जाणार आहे. रेड चिलीज एंटरटेनमेंट आणि धर्मा प्रॉडक्शन्स यांची संयुक्त निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन अभय चोप्रा यांनी केले आहे.चित्रपटात सोनाक्षी सिन्हा, सिध्दार्थ मल्होत्रा आणि अक्षय खन्ना यांच्या प्रमुख भूमिका असून मंदिरा बेदी आणि समीर शर्मा हेही महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.राशोमान या जगप्रसिध्द चित्रपटाच्या शैलीनुसार सादर करण्यात आलेल्या या चित्रपटाची कथा अतिशय तीक्ष्ण,धारदार आणि वेगवान आहे.तसेच कथानकाला मध्येच बसणाऱ्या अनपेक्षित धक्क्यांमुळेही प्रेक्षकांचे मन अखेरपर्यंत या खुनाचे गूढ उकलण्यात गुंतून राहते.सोनाक्षी सिन्हा,सिध्दार्थ मल्होत्रा आणि अक्षय खन्ना यांच्या अप्रतिम अभिनयाने विनटलेल्या या चित्रपटात मधूनच नर्म विनोदाची झुळूकही वाहात असते.या चित्रपटाने अनेक पुरस्कारांच्या गटात नामांकने मिळविली असून त्यात सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता,सर्वोत्कृष्ट खलनायक/नायिका,पदार्पणातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक,सर्वोत्कृष्ट संकलन वगैरे गटांचा समावेश आहे.चित्रपटात नामवंत संगीतकार बप्पी लाहिरी यांच्या रात बाकी,बात बाकी या एका सुपरहिट गाण्याचे पुन केले असून ते निकिता गांधी आणि झुबिन नौटियाल यांनी गायले आहे.प्रसिध्द ब्रिटिश लेखक विक्रम सेठी (सिध्दार्थ मल्होत्रा) हा आपल्या दुसऱ्या कादंबरीच्या प्रकाशनानिमित्त मुंबईत आलेला असतो.त्याच्यावर आपल्या पत्नीचा खून केल्याचा आरोप असल्याने पोलिसही त्याच्या मागावर असतात;पण तेव्हा मुंबईच्या धुंवाधार पावसापासून स्वत:चा बचाव करण्यासाठी तो माया (सोनाक्षी सिन्हा) हिच्या घरात आश्रय मिळवितो.विक्रम हा एका खुनाच्या घटनेतील प्रमुख संशयित आहे, ही गोष्ट मायाला कळते आणि ती पोलिसांना घरी बोलावते.पण पोलिस घरी येतात, तेव्हा त्यांना मायाचा पती शेखर याचा मृतदेह घरात सापडतो.विक्रमनेच आपल्या पतीचा खून केला असल्याचा आरोप माया करते,पण विक्रम तो आरोप फेटाळून लावतो.त्यामुळे या दुहेरी खुनाच्या केस देव (अक्षय खन्ना) या सीबीआय अधिकाऱ्याकडे सुपूर्द केली जाते.या दोन्ही घटनांतील खरा खुनी तीन दिवसांत शोधून काढण्याचे आव्हान देवपुढे असते. आता विक्रम हा मायाच्या सौंदर्यामागे दडलेल्या फसवणुकीचा बळी आहे की माया दावा करीत असल्याप्रमाणे संकटात सापडलेली एक अबला आहे,याचा निर्णय देवला केवळ तीन दिवसांत करायचा असतो.या दोन खुनांचा काही परस्परसंबंध असतो का? या खुनांची या दोघांनी सांगितलेल्यापैकी कोणाची कथा खरी आहे की त्यामागे कोणी तिसरीच व्यक्ती आहे?अशा सगळ्या गोष्टी रसिकांना छोट्या पडद्यावर पाहायला मिळणार आहेत.