Sunny Deol: अभिनेता सनी देओल त्याच्या अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जातो. 'गदर २'नंतर तो पुन्हा एकदा अॅक्शनचा भरपूर डोस असलेल्या 'जाट' चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. 'जाट' सिनेमा १० एप्रिल रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला आहे. बॉलिवूडपासून ते दक्षिणेपर्यंत या चित्रपटाची जबरदस्त क्रेझ दिसून येत आहे. सोशल मीडियावरही या चित्रपटाची खूप चर्चा होत आहे. 'जाट'च्या प्रमोशनसाठी सनी देओलने अनेक ठिकाणी मुलाखतीही दिल्यात. एका मुलाखतीमध्ये सनीनं त्याच्या एका इच्छेचा खुलासा केला. पण, दुर्दैवानं त्याची ती इच्छा आता कधीच पुर्ण होणार नाही.
४० वर्षांपूर्वी अभिनेत्याचा 'अर्जुन' चित्रपट प्रदर्शित झाला होता. सनीला तो चित्रपट पुन्हा थिएटरमध्ये प्रदर्शित करायचा आहे. पण, इच्छा असली तरी आता तसे होऊ शकत नाही. सनी देओलने बॉलिवूड बबलला दिलेल्या मुलाखतीत अनेक मुद्द्यांवर भाष्य केले. यादरम्यान, जेव्हा त्याला त्याचा कोणताही चित्रपट पुन्हा प्रदर्शित करावा वाटतो असं विचारण्यात आलं, तेव्हा त्याने 'अर्जुन' चित्रपटाचं नाव घेतलं. पण, 'अर्जुन' चित्रपटाची एकही प्रिंट शिल्लक नाही. त्यामुळे तो प्रदर्शित करता येणार नसल्याची खंत त्यानं व्यक्त केली.
सनी देओलचा 'अर्जुन' हा चित्रपट २० एप्रिल १९८५ रोजी प्रदर्शित झाला होता. चित्रपटाची कथा भ्रष्टाचार, गुन्हेगारी आणि अन्यायावर आधारित होती. ४० वर्षांपूर्वी हा चित्रपट १.५० कोटी रुपयांमध्ये बनवण्यात आला होता. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर ८.५ कोटी रुपये कमावले होते. हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि या चित्रपटाची कथाही प्रेक्षकांना खूप आवडली होती. दरम्यान, सनीच्या 'जाट' सिनेमाच्या निर्मितीसाठी १०० कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. हैदराबाद, बापटला आणि विशाखापट्टणममध्ये 'जाट'चे शूटिंग करण्यात आले आहे.