जॅकी श्रॉफ हा केवळ एक खूप चांगला अभिनेताच नव्हे तर खूप चांगला व्यक्ती देखील आहे आणि त्याने आजवर हे सिद्ध देखील केले आहे. जॅकी गरिबांच्या मदतीसाठी नेहमीच धावून जातो आणि आता तो त्याच्या घरी काम करणाऱ्या महिलेचे सांत्वन करण्यासाठी मावळला गेला होता.
जॅकीच्या घरात काम करणाऱ्या महिलेच्या आजीचे नुकतेच निधन झाले. जॅकीला ही बातमी कळल्यानंतर तो त्या महिलेच्या घरी म्हणजेच पुणे जिल्ह्यातील मावळमधील पवनानगर येथे दाखल झाला आणि त्याने त्या महिलेच्या कुटुंबियांची भेट घेतली. दिपाली तुपे या महिला जॅकी श्रॉफकडे अनेक दिवसांपासून घरकाम करतात. त्यांच्या आजीचे म्हणजेच तान्हाबाई ठाकर यांचे काही दिवसांपूर्वी निधन झाले. तान्हाबाई यांनी वयाची शंभरी गाठली होती. त्यांच्या निधनाची बातमी कळल्यानंतर जॅकी दिपाली यांच्या आजीच्या घरी गेला आणि त्याने कुटुंबियांचे सांत्वन केले.
जॅकी श्रॉफने त्याचे बालपण एका चाळीत घालवले आहे. तो आज प्रचंड श्रीमंत असला तरी त्याचे ते दिवस तो आजही विसरलेला नाहीये. जॅकीने गेल्या काही वर्षांत खूप चांगली प्रॉपर्टी बनवली आहे. पुण्यातील मावळ येथील चांदखेड येथे जॅकीचा बंगला असून तो अनेकवेळा तिथे मुक्कामाला जातो. नुकताच तो मावळला गेला होतो. त्यावेळी त्याच्याकडे काम करणाऱ्या दिपाली यांच्या आजीचे वयाच्या शंभराव्या वर्षी निधन झाले असल्याचे त्याला कळले. त्याने लगेचच दिपाली यांच्या घरी जाऊन त्यांच्या कुटुंबियांची विचारपूस केली. एखाद्या स्टारप्रमाणे नव्हे तर एखाद्या साध्या माणसाप्रमाणे त्याने जमिनीवर बसून दिपालीच्या घरातल्यांचे सांत्वन केले. त्याला पाहून घरातील सगळे भारावून गेले.