नवी दिल्ली - २०० कोटी रुपयांच्या कथित मनी लाँड्रिंग प्रकरणामध्ये ईडीने केलेल्या चौकशीमध्ये ठकसेन सुकेश चंद्रशेखर याने काही धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. या चौकशीमध्ये जॅकलिन फर्नांडिसचे नावही समोर आले होते. सुकेश चंद्रशेखरने जॅकलिनल काही महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. त्या तपास यंत्रणांनी जप्त केल्या आहेत. आता सुकेश चंद्रशेखरचे वकील अनंत मलिक यांनी पत्रकामधून एक वक्तव्य केले आहे, त्यामध्ये त्यांनी सांगितले की, सुकेश चंद्रशेखर याला ठक किंवा लबाड म्हणजे योग्य ठरणार नाही, कारण तो अजून दोषी सिद्ध झालेला नाही. तसेच सुकेश चंद्रशेखर आणि जॅकलिन फर्नांडिस हे नात्यामध्ये होते. तसेच त्यांच्या वैयक्तिंक संबंधांचा या गुन्हेगारी प्रकरणाशी काहीही संबंध नाही.
लुकआऊट सर्क्युलरला डाऊनग्रेड करण्यासाठी जॅकलिन फर्नांडिसने केलेला अर्ज ईडीने फेटाळून लावल्यानंतर हे वक्तव्य समोर आले आहे. परदेशात जाता यावे यासाठी जॅकलिन फर्नांडिस हिने हा अर्ज केला होता. मात्र ईडीने हा अर्ज फेटाळून लावल्यानंतर जॅकलिन फर्नांडिस हिला आता देश सोडता येणार नाही.
सक्तवसुली संचालनालयाने ५ डिसेंबर रोजी फर्नांडिस यांच्याविरोधात एलओसी जारी केला होता. त्यानंतर लुक आऊट नोटिशीमुळे इमिग्रेशन अधिकाऱ्यांनी जॅकलिन फर्नांडिस हिला मुंबई विमानतळावर रोखले होते. ती मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून एका कार्यक्रमासाठी मस्कत येथे जात होती. त्यानंतर तिला चौकशीसाठी दिल्लीत आणण्यात आले होते.
ई़डीने २०० कोटी रुपयांच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात सुकेश चंद्रशेखर आणि अन्य आरोपींविरोधात दिल्लीतील एका रुग्णालयामध्ये आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. त्यामध्ये त्याने तिहार कारागृहात असलेल्या एका व्यावसायिकाच्या पत्नीकडून २०० कोटी रुपये उकळल्याचा आरोप आहे. तसेच मूळची श्रीलंकन असलेल्या जॅकलिन फर्नांडिसची या प्रकरणात ईडीने अनेकदा चौकशी केली आहे.
ईडीने आपल्या चार्जशिटमध्ये म्हटले आहे की, जॅकलिन फर्नांडिस आणि अभिनेत्री-डान्सर नोरा फतेही हिला या ठकसेन सुकेश चंद्रशेखर याने लक्झरी कार आणि अन्य महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या. ईडीने मनी लाँड्रिंगविरोधी कायद्यांतर्गत दाखल चार्जशिटमध्ये सांगितले की, चंद्रशेखर हा कथितपणे मेकअप आर्टिस्ट शान मुत्ताथिल याच्या माध्यमातून जॅकलिन फर्नांडिस हिच्या संपर्कात आला होता.