श्रीलंकन ब्युटी अर्थात जॅकलीन फर्नांडिस (Jacqueline fernandez) हिने कलाविश्वात तिचा चांगलाच जम बसवला आहे. त्यामुळे बॉलिवूडची लोकप्रिय अभिनेत्री म्हणून तिच्याकडे पाहिलं जातं. अलिकडेच तिने ७७ व्या कान्स फेस्टिव्हलमध्ये हजेरी लावली होती. यावेळी तिच्या सौंदर्याने उपस्थितांच्या नजरा तिच्याकडे वेधल्या गेल्या. जॅकलीनने तिच्या सौंदर्य आणि अभिनयकौशल्याच्या जोरावर इंडस्ट्रीत तिचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. पण, तिचा हा प्रवास सोपा नव्हता. सुरुवातीच्या काळात तिने बराच स्ट्रगल केला आहे. एका मुलाखतीमध्ये तिने तिच्या स्ट्रगलविषयी भाष्य केलं. सोबतच इंडस्ट्रीत टिकून रहायचं असेल तर नेमकं काय केलं पाहिजे हे सुद्धा तिने सांगितलं.
इंडस्ट्रीमध्ये कास्टिंग काऊच किंवा बॉडी शेमिंग होणं हा प्रकार नवीन नाही. आतापर्यंत अनेक अभिनेत्री बॉडी शेमिंगच्या शिकार झाल्या आहेत. त्यामुळे बऱ्याचदा अभिनेत्री सुंदर दिसण्यासाठी प्लास्टिक सर्जरी किंवा तत्सम सर्जरी करतात. मात्र, यामुळेही त्यांना ट्रोल व्हावं लागतं. अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसलाही बऱ्याचदा तिच्या लूक्सवरुन ट्रोल करण्यात आलं आहे. त्यामुळे या मुलाखतीमध्ये तिने एक सल्ला दिला आहे.
"करिअरच्या सुरुवातीला मी माझ्या शरीराकडे विशेष लक्ष द्यायचे. दररोज जीमला जायचे. तेव्हा एका अभिनेत्रीने मला सांगितलं होतं की वयाच्या ३० वर्षानंतर बॉलिवूड अभिनेत्रींचं करिअर संपून जातं. त्यामुळे सुंदर दिसणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला मला डायलॉग बोलतांना खूप मेहनत घ्यावी लागायची. त्यासाठी मी हिंदी सिनेमा पाहायचे. चांगलं ऐकून आणि वाचून मला हिंदी बोलता यायला लागली होती", असं जॅकलीन म्हणाली.
पुढे ती म्हणते, "मला माझ्या नाकावरुन खूप टोमणे ऐकावे लागले. अनेकांनी मला नाकाची सर्जरी करण्याचा सल्ला दिला.पण, हा सगळा मुर्खपणा आहे. तुम्ही कसे दिसता यापेक्षा तुम्ही किती चांगलं काम करता हे जास्त महत्त्वाचं आहे. मला टोमणे मारणाऱ्या सगळ्यांना मी हेच सांगेन की, मला माझं नाक आहे तसंच आवडतं. त्यामुळे मी सर्जरी करणार नाही.तुमचं दिसणं नाही तर तुमचं काम तुम्हाला ओळख मिळवून देतं यावर माझा ठाम विश्वास आहे."