बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिस(Jacqueline Fernandez)च्या अडचणीत वाढ झालीय. २१५ कोटींच्या खंडणी प्रकरणी अभिनेत्रीवर आरोपपत्र दाखल करण्यात आलंय. सुकेश चंद्रशेखर प्रकरणात पुरवणी आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला माहिती होती की, सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrasekhar) खंडणी वसूल करणार आहे. त्यानंतर आता अंमलबजावणी संचालनालयाने (ED - Enforcement Directorate) जॅकलिन फर्नांडिसवर आरोपपत्र दाखल केलंय. ईडीने २१५ कोटींच्या खंडणी प्रकरणात जॅकलिन फर्नांडिसला आरोपी असल्याचे म्हटलंय.
ईडीने समन्स बजावल्यानंतर जॅकलिन फर्नांडिसची दिल्लीतील ईडीच्या कार्यालयात चौकशी झाली होती. सुकेश चंद्रशेखर प्रकरणी जॅकलिनचे नाव समोर आलंय. सुकेश चंद्रशेखरकडून महागडी जनावरं गिफ्ट घेणे अंगाशी आलंय. मुंबई विमानतळावर ईडीनं तिला थांबवलं होतं. २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणाची चौकशी झाली असल्याची माहिती आहे.
जॅकलिन आणि सुकेशचा एक फोटोदेखील समोर आला होता. हा फोटो समोर आल्यानंतर जॅकलिन आणि सुकेश रिलेशनशिपमध्ये असल्याचा दावा करण्यात आला होता. दिल्लीच्या तिहार तुरुंगातून २०० कोटी रुपये वसूल केल्याप्रकरणी ईडीने शनिवारीच आरोपपत्र दाखल केले होते.