जान्हवी कपूरचा पहिला-वहिला बॉलिवूड चित्रपट ‘धडक’ नुकताच रिलीज झाला आणि बघता बघता १००कोटींच्या क्लबमध्येही सामील झाला. या चित्रपटाने वर्ल्डवाईड १००कोटींचा आकडा पार केला. चित्रपटाला मिळत असलेला हा प्रतिसाद पाहून जान्हवी कपूर आनंदी आहे. पण एक गोष्ट मात्र तिला आतून अस्वस्थ करतेय. ती म्हणजे, आईची अनुपस्थिती. सोमवारी रात्री जान्हवी वोग ब्युटी अवार्ड सोहळ्याला पोहाचली. तिचा स्टाईलिश अंदाज सगळ्यांनाच भावला. जान्हवीच्या चेहऱ्याभर हसू होते. पण डोळ्यांत मात्र अश्रूंची गर्दी होती. आजपर्यंत अशा अनेक अवार्ड शोला जान्हवी आईसोबत गेली होती. पण या अवार्ड शोला पहिल्यांदा तिची आई तिच्यासोबत नव्हती. मीडियासोबत बोलताना जान्हवीने याचा उल्लेख केला.
आज या अवार्ड शोमध्ये हजेरी लावणे, माझ्यासाठी अनेकार्थाने खास आहे. पण अशा इव्हेंटला केवळ मम्मा-पप्पासोबत जाण्याची सवय मला आहे. विशेषत: मॉमसोबतचं मी अशा इव्हेंटला गेलेली आहे. गर्दीत कुणाचा हात पकडायचा झाल्यास, ती सतत माझ्यासोबत असायची. त्यामुळे आज कुणाचा हात पकडू, मला कळत नाहीये. मी काहीशी नव्हर्स आहे, असे जान्हवी म्हणाली. अर्थात या स्थितीतही जान्हवी स्वत:ला खुबीने सांभाळले. पण तिचे ते शब्द अनेकांच्या काळजाला भेदून गेले.
जान्हवीने ‘धडक’ या डेब्यू सिनेमाचे शूटींग सुरू केले तेव्हा सुरूवातीला अनेक दिवस श्रीदेवी तिच्यासोबत सेटवर जायच्या. खरे तर जान्हवीने बॉलिवूडमध्ये करिअर करू नये, अशी श्रीदेवींची इच्छा होती. पण जान्हवीने करिअरसाठी बॉलिवूडची निवड केल्यावर श्रीदेवींनी मुलीच्या या निर्णयाचा आदर करत, तिला सगळी मुभा दिली. केवळ इतकेच नाही तर बॉलिवूडच्या डेब्यूपूर्वी अगदी तिच्या व्यक्तिमत्त्व विकासापासून तर तिच्या लूक्सपर्यंत सगळ्या गोष्टींकडे त्यांनी जातीने लक्ष दिले. जान्हवीचे स्टारडम पाहण्याची त्यांची इच्छा होती. पण नियतीच्या मनात काही वेगळेच होते. लेकीचा पहिला सिनेमा रिलीज होण्याआधीच श्रीदेवींनी जगाचा निरोप घेतला.