Join us

चित्रपटसृष्टीत पसरली शोककळा ! 'जय संतोषी माँ' फेम अभिनेत्री बेला बोस यांचं निधन

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2023 1:04 PM

बेला बोस यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे.

मनोरंजन जगतातून एक वाईट बातमी समोर येत आहे. 'शिकार', 'जीने की राह' आणि 'जय संतोषी मां' यांसारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये दिसलेल्या ज्येष्ठ अभिनेत्री आणि शास्त्रीय नृत्यांगना बेला बोस यांनी जगाचा निरोप घेतला. वयाच्या ७९ व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. बेला बोस यांच्या निधनाच्या वृत्ताने संपूर्ण चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. अभिनय क्षेत्रात मोलाचं योगदान देणाऱ्या बेला बोस यांच्या जाण्यानं अनेक कलाकांनी दु:ख व्यक्त करत त्यांना श्रद्धांजली वाहिली. 

ज्येष्ठ अभिनेत्री बेला बोस यांनी 200 हून अधिक हिंदी आणि प्रादेशिक भारतीय चित्रपटांमध्ये काम केले आहे. अभिनयासोबतच त्या नृत्यकलेतही पारंगत होत्या. असं म्हणतात की रंगमंच म्हणजे त्यांचं सर्वस्व होतं. इथं आल्यावर त्या वेगळ्याच दुनियेत हरपून जात होत्या. मणिपुरी शास्त्रीय नृत्य प्रकारात त्या निपुण होत्या.  बेला बोस या कलेप्रती असणाऱ्या त्यांच्या समर्पक वृत्तीमुळं ओळखल्या जात होत्या.

बेला बोस यांची पहिली प्रमुख भूमिका वयाच्या २१ व्या वर्षी १९६२ साली आलेल्या 'सौतेला भाई' चित्रपटात होती.बेलाचा जन्म कोलकाता येथे झाला. त्यांचे वडील कापड व्यावसायिक होते. मात्र, नंतर त्यांच्या कुटुंबाला अनेक आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला. वास्तविक ज्या बँकेत त्यांच्या कुटुंबाचे सर्व पैसे ठेवले होते, ती बँक बुडाली. त्यामुळे कुटुंबाला आर्थिक अडचणींचा सामना करावा लागला.त्यानंतर त्यांनी मुंबई गाठली. पण, इथं आल्यानंतर काही दिवसांतच वडिलांचा अपघाती मृत्यू झाला. वडिलांचा आधार गमावल्यानंतर बेला यांनी चित्रपटांमध्ये कारकिर्दीची सुरुवात केली. सोबतच त्यांनी शिक्षणही सुरु ठेवलं.

टॅग्स :सेलिब्रिटीमृत्यू