‘जल्लीकट्टू’ हा मल्याळी भाषेतील सिनेमा ऑस्कर स्पर्धेतून बाहेर पडला आहे. 93 व्या ऑस्करपुरस्कारासाठी भारताकडून ‘जल्लीकट्टू’ या सिनेमाची निवड करण्यात आली होती. मात्र बुधवारी अॅकेडमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अॅण्ड सायन्सेसने जारी केलेल्या आणि पुढील फेरीसाठी निवडल्या गेलेल्या इंटरनॅशनल फिचर फिल्म श्रेणीतील 15 सिनेमांच्या यादीत ‘जल्लीकट्टू’ आपले स्थान कायम ठेवू शकला नाही.ऑस्कर निवड समितीने 9 श्रेणीतील पुढच्या फेरीसाठी पात्र ठरलेल्या सिनेमांची यादी जाहीर केली. यात इंटरनॅशनल फिचर फिल्म, डॉक्युमेंट्री, ओरिजनल स्कोर, ओरिजनल सॉन्ग, मेकअप अॅण्ड हेअर स्टाईल, व्हिज्युअल इफेक्टस, लाईव्ह-अॅक्शन शॉर्ट फिल्म, डॉक्युमेंट्री शॉर्ट सब्जेक्ट आणि अॅनिमेटेड शॉर्ट फिल्म अशा श्रेणींचा समावेश आहे.
एक आशा कायम
ऑस्करच्या शर्यतीतून ‘जल्लीकट्टू’ हा सिनेमा बाहेर पडला. मात्र ऑस्कर जिंकण्याची भारतीयांची एक आशा अद्यापही कायम आहे. करिश्मा देव दुबेच्या ‘बिट्टू’ या शॉर्टफिल्मने लाईव्ह अॅक्शन शॉर्टफिल्म श्रेणीत स्थान पक्के केले आहे. बिट्टू ही मैत्रीची कथा आहे. लाईव्ह अॅक्शन शॉर्टफिल्म श्रेणीत ‘बिट्टू’ ऑस्करवर नाव कोरते का, हे पाहणे इंटरेस्टिंग असणार आहे. ऑस्कर च्या अंतिम नामांकनाची घोषणा 15 मार्चला होणार आहे. 25 एप्रिलला ऑस्कर सोहळा होणार आहे.
‘जल्लीकट्टू’ चित्रपटाची कथा वार्के आणि अँटनी नामक व्यक्तींवर आधारीत आहे, जे एक कत्तलखाना चालवत असतात. त्याच्या कत्तलखान्यामध्ये म्हशींना ठार मारून त्याचे मांस, कातडे आदी गोष्टींची विक्री होत असते. एक दिवस एक म्हैस कत्तलखान्यातून पळून जाते आणि बेफाम होऊन ती संपूर्ण गावात दहशत माजवते. या म्हशीला पकडण्यासाठी पोलिसांना बोलवले जाते. संपूर्ण गाव तिला पकडण्यासाठी एकत्र येते.मात्र, ती म्हैस कुणालाही बधत नाही. त्या म्हशीला पकडण्यासाठी आणि तिच्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी करण्यात येणारे विविध प्रयत्न या चित्रपटात बघायला मिळतात.
‘जल्लीकट्टू’ चित्रपटाचा वर्ल्ड प्रीमिअर २०१९ टोरंटो आंतरराष्ट्रीय सिनेमहोत्सवात झाला होता. त्यानंतर हा चित्रपट २४व्या बुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये दाखवण्यात आला होता. ‘जल्लीकट्टू’चे दिग्दर्शक लिजो जोस पेलिसरी यांना भारतातील ५० व्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवामध्ये सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनासाठी दिला जाणारा पुरस्कार मिळाला होता.