Join us

श्रीदेवीचे ज्युनियर एनटीआर-राम चरण यांच्या कुटुंबाशीही कसे होते संबंध ? जान्हवी कपूरने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 15:53 IST

अलिकडेच जान्हवी हिचा 'मिस्टर अँड मिसेस माही'  सिनेमा प्रदर्शित झाला.

बॉलिवूडमध्ये अभिनयाची जादू चालवल्यानंतर आता अभिनेत्री जान्हवी कपूर लवकरच ज्युनियर एनटीआरसोबत 'देवरा'मध्ये झळकणार आहे. या सिनेमातून जान्हवी ही तेलुगूमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज झाली आहे. ज्युनियर एनटीआर आणि जान्हवी ही फ्रेश जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.  दोघांची केमिस्ट्री पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहतेही उत्सुक आहेत. आता अलीकडेच एका मुलाखतीत जान्हवीनं तिच्या साऊथ डेब्यूबद्दल भाष्य केलं. एवढेच नाही तर जान्हवीने अभिनेत्री श्रीदेवीचे ज्युनियर एनटीआर आणि राम चरण यांच्या कुटुंबियांशीही कसे नाते-संबंध होते, याचाही खुलासा तिनं केला. 

अलिकडेच जान्हवी हिचा 'मिस्टर अँड मिसेस माही'  सिनेमा प्रदर्शित झाला. या सिनेमाच्या प्रमोशनसाठी ती विविध ठिकाणी मुलाखती देत आहे. नुकतेच पीटीआयशी बोलताना जान्हवीने दाक्षिणात्य सिनेमा आणि श्रीदेवी यांच्यावर भाष्य केलं. ती म्हणाली, 'साऊथ इंडस्ट्रीत येण्याची हीच योग्य वेळ आहे.  साऊथमध्ये काम केल्याने आईच्या अगदी जवळ असल्यासारखं वाटतं, त्या वातावरणात राहणे, ती भाषा ऐकणे, बोलणे, मला वाटतं मी त्याकडे आकर्षित होत आहे'. 

जान्हवी म्हणाली, 'एनटीआर आणि राम चरण यांच्या कुटुंबियांशीही आईचे चांगले संबंध होते. या दोन्ही टॅलेंटेड स्टार्ससोबत काम करायला मिळणं हा माझ्यासाठी सन्मान आहे'.  जान्हवी कपूरच्या 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमात अभिनेता राजकुमार रावदेखील आहे. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई करत आहे. याशिवाय अभिनेत्री लवकरच 'उलज', 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी', 'आरसी 16' मध्ये राम चरणसोबत दिसणार आहे. 

टॅग्स :जान्हवी कपूरश्रीदेवीसेलिब्रिटीराम चरण तेजा