ठळक मुद्देनिवडणूक काळात सोशल मीडियावर अनेक फेक अकाऊंट दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचा एक जुना फोटो एडिट करून, ते भाजपाचा प्रचार करत आहेत, असे भासवण्यात आले होते.
लोकसभा निवडणुकीचा ज्वर चढू लागला असताना बॉलिवूडमध्ये अगदी अलीकडे पदार्पण करणारी जान्हवी कपूर अचानक चर्चेत आली आहे. होय, श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवी कपूरचे एक ट्विट सध्या वा-याच्या वेगाने व्हायरल होत आहे. जान्हवीचे हे ट्विट नेहमीप्रमाणे साधे-सरळ असते तर हरकत नव्हतीच. पण ते निघाले राजकीय. मग काय? पोस्ट होताच ते ट्रेंड करू लागले. काहीच तासांत हे ट्विट३६०० वेळा रि- ट्विट केले गेले आणि त्याला १२ हजारांवर लाईक्स मिळाले.
आता या ट्विटमध्ये असे काय आहे,हे जाणून घेण्यास तुम्ही उत्सूक असाल. तर मोदींचा प्रचार. होय, ‘मला राजकारणाची समज नाही. पण देशाला मोदीजींची गरज आहे, हे मला चांगले ठाऊक आहे,’ असे ट्विट जान्हवीने केले. जान्हवी मोदींचा प्रचार करतेय, असा या ट्विटचा अर्थ काढला गेला. पण थांबा...थांबा... जान्हवीने कुणाचाही प्रचार केला नाही. कारण मुळातच हे ट्विटर अकाऊंट फेक होते. जान्हवी कपूरच्या नावाने बनवण्यात आलेल्या फेक अकाऊंटवरून हे ट्विट केले गेले होते.तुम्हाला ठाऊक असेलच की, जान्हवी कपूर ट्विटरवर नाही. सोशल मीडियावर तिचे वेरिफाईड इन्स्टाग्राम अकाऊंट आहे. ट्विटरवर मात्र तिचे असे कुठलेही वेरिफाईड अकाऊंट नाही. जान्हवीच्या नावाने बनवण्यात आलेले ट्विटर अकाऊंट २७ जूनला क्रिएट केले गेले आहे. आत्तापर्यंत यावरून केवळ १९ ट्विट करण्यात आली आहेत.
निवडणूक काळात सोशल मीडियावर अनेक फेक अकाऊंट दिसत आहेत. काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचा एक जुना फोटो एडिट करून, ते भाजपाचा प्रचार करत आहेत, असे भासवण्यात आले होते. अर्थात नंतर हा फोटो फोटोशॉप्ड असल्याचे लक्षात आले होते.