अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) सध्या तिच्या एकामागोमाग एक सिनेमांमुळे चर्चेत आहे. काही महिन्यांपूर्वीच तिचा आलेला 'मिस्टर अँड मिसेस माही' हिट झाला. आता ती आगामी 'उलझ' सिनेमात दिसणार आहे. सध्या जान्हवी या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. यानिमित्त झालेल्या एका मुलाखतीत जान्हवीने पेड पीआर या मुद्द्यावर भाष्य केलं.
अनेकदा कलाकार सोशल मीडियावर आपली प्रतिमा चांगली असावी म्हणून अनेक युक्त्या करतात. यातच एक म्हणजे पेड पीआर. सोशल मीडियावर कलाकाराची सतत स्तुती होत राहावी म्हणून कलाकार पैसे देऊन पीआर मार्फत ते घडवून आणतात. जान्हवी कपूरवरही सध्या पेड पीआरचा आरोप होत होता. या आरोपांवर उत्तर देत ती म्हणाली, "जेव्हा कोणी सोशल मीडियावर चुकून माझी स्तुती केली ना तर लोक म्हणतात हिच्या पीआरनेच केलं असेल. पण माझं त्यांना म्हणणं आहे की अरे माझं एवढं बजेटच नाहीए कमी लोकांकडून स्तुती करुन घेऊ."
ती पुढे म्हणाली, "मी स्वत:बद्दल कसं बोलू की मी मोठी कॉन्फिडेंट झाली आहे. चांगले चांगले परफॉर्मन्स देत आहे. हे सगळं मी स्वत:च स्वत:बद्दल बोलू शकत नाही. स्वत:च्याच तोंडाने मी स्वत:चीच तारीफ करु शकत नाही."
जान्हवी कपूरने 'धडक' सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. आतापर्यंत तिने 'मिली','रुही','गुंजन सक्सेना','गुडलक जेरी','मिस्टर अँड मिसेस माही','बवाल' या सिनेमांमध्ये काम केलं आहे. लवकरच ती ज्युनिअर एनटीआरसोबत साऊथच्या 'देवारा:पार्ट 1' मध्येही दिसणार आहे.