श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची लाडकी लेक जान्हवी कपूर (Janhvi Kapoor) रिलेशनशिपमध्ये आहे. माजी मुख्यमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा नातू शिखर पहाडियाला (Shikhar Pahariya) ती डेट करत आहे. अनेकदा दोघंही पार्टी असो किंवा इव्हेंटमध्ये सोबत दिसतात. इतकंच नाही तर जान्हवीने शिखरसोबत तिरुपती बालाजीचंही दर्शन घेतलं. काल बोनी कपूर यांच्या 'मैदान' स्क्रीनिंगला जान्हवीने हजेरी लावली. यावेळी तिच्या नेकलेसने सर्वांचंच लक्ष वेधलं.
'मैदान'च्या स्क्रीनिंगसाठी जान्हवी एकटीच आली होती. तिच्यासोबत बॉयफ्रेंड शिखर पहाडिया आला नव्हता. पण तो नसला म्हणून काय झालं जान्हवीने गळ्यात त्याच्या नावाचंच पेंडेंट घातलं होतं. ऑफ व्हाईट रंगाचा डीपनेक कोट, पँट अशा लूकमध्ये ती आली होती. हातात महागडी पर्स होती. सिल्व्हर रंगाचा नाजुक नेकलेस तिने परिधान केला होता. या नेकलेसमध्ये 'शिकू' नावाचं पेंडंट होतं ज्यावर नेटकऱ्यांची बारीक नजर गेली. हे पाहून जान्हवीने आता थेट प्रेमाची कबुली दिली आहे का या चर्चा सुरु झाल्या. सेलिब्रिटी फोटोग्राफर व्हिरल भयानीने जान्हवीचा हा व्हिडिओ पोस्ट केला आहे.
नेटकऱ्यांनी कमेंट करत 'नेकलेसवर शिकू लिहिलंय का?' अशी कमेंट केली आहे. जान्हवी एकदम स्टायलिश लूकमध्ये या इव्हेंटला हजेरी लावली. ती लवकरच आगामी ज्युनिअर एनटीआर, 'देवरा', रामचरण तेजाच्या RC16 या दाक्षिणात्य सिनेमांमध्ये दिसणार आहे. तर वरुन धवनसोबत ती 'सनी संस्कारी की तुलसी कुमारी' सिनेमात झळकणार आहे.