बॉलिवूड अभिनेत्री जान्हवी कपूर (Janhvi Kapoor ) लवकरच दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीत तिची नवी इनिंग सुरू करण्यासाठी सज्ज आहे. तिच्या डेब्यू सिनेमाचे नाव 'देवारा' आहे, ज्याच्या पहिल्या भागात ती ज्युनियर एनटीआरसोबत दिसणार आहे. तर सैफ अली खान खलनायकाच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट या वर्षी ऑक्टोबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे, पण त्याआधी जान्हवीने सांगितले की या चित्रपटाद्वारे ती तिच्या मुळाकडे जात आहे, कारण ती तेलुगू शिकत आहे.
अलीकडेच 'द वीक'ला दिलेल्या मुलाखतीत जान्हवी कपूरने तिच्या आगामी 'देवारा' चित्रपटाबद्दल सांगितले. ती म्हणाली की, ती या चित्रपटाचा एक भाग आहे, याचा तिला खूप आनंद आहे. कारण या चित्रपटाद्वारे ती तिच्या मुळांच्या जवळ येत आहे. ती तेलुगू शिकत आहे. अशी माहिती आहे की जान्हवीची आई श्रीदेवीने ज्युनियर एनटीआरचे आजोबा एनटी रामाराव यांच्यासोबत साऊथ इंडस्ट्रीमध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली होती.
जान्हवी तिच्या आईच्या पावलावर पाऊल टाकत आहे असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. ती म्हणाली, 'मी या चित्रपटाचा एक भाग आहे याचा मला आनंद होत आहे, जो मला भाषा शिकण्याची संधी देत आहे आणि त्यामुळे मी माझ्या मुळांच्या जवळ येत आहे असे मला वाटत आहे.'
'देवारा' टीमने केली खूप मदत
जान्हवी म्हणाली, 'मी तेलुगू कधीच शिकले नाही. या गोष्टीची मला लाज वाटते. मी ते फोनेटिकली समजू शकते, पण बोलू शकत नाही. होय, मला खूप खेद वाटतो. गेल्या काही दिवसांपासून माझे या भागाकडे दुर्लक्ष होत आहे, पण 'देवारा' टीमने खूप संयम आणि मदत केली आहे. मी अशा दिग्गज लोकांसोबत काम करत आहे आणि मी खूप आभारी आहे की ते माझ्या मदतीसाठी लगेच धावून येतात. कोरटाला शिवाच्या दिग्दर्शनाखाली बनत असलेल्या 'देवारा: पार्ट १' या चित्रपटात जान्हवी थंगम नावाच्या खेड्यातील मुलीची भूमिका साकारताना दिसणार आहे. चाहत्यांना जान्हवी पहिल्यांदाच अशा भूमिकेत पाहायला मिळणार आहे.
वर्कफ्रंट
जान्हवीच्या इतर चित्रपटांबद्दल बोलायचे तर तिच्याकडे 'मिस्टर अँड मिसेस माही' सिनेमा आहे. ती 'उलझ'मध्येही दिसणार आहे. याशिवाय ती करण जोहरच्या 'सनी संस्कार की तुलसी कुमारी'मध्येही काम करणार आहे, ज्यामध्ये ती वरुण धवनसोबत दिसणार आहे.