Join us

खिशात 27 रूपये घेऊन मुंबईत आले होते जावेद अख्तर, चार दिवस होते उपाशी...!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2020 10:59 AM

‘शब्दांचे जादूगार’ जावेद अख्तर यांचा आज वाढदिवस.

ठळक मुद्दे जावेद यांनी ‘शोले’ सिनेमाच्या स्क्रिनप्लेसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी केली होती.

‘शब्दांचे जादूगार’ जावेद अख्तर या नावाला कुठल्याही परिचयाची गरज नाही. केवळ शब्दांच्या जोरावर जावेद यांनी बॉलिवूडमध्ये एक आगळी-वेगळी ओळख निर्माण केली. शायर, कवी, गीतकार असलेल्या याच  शब्दांच्या जादूगाराचा आज   (17 जानेवारी) वाढदिवस.  17 जानेवारी 1945 रोजी त्यांचा जन्म झाला. आज त्यांच्याकडे प्रसिद्धी, पैसा असे सगळे काही आहे. पण एकेकाळी याच जावेद यांना मुंबईच्या फुटपाथ उपाशापोटी राहावे लागले होते.खुद्द जावेद यांच्या पत्नी शबाना आझमी यांनी काही दिवसांपूर्वी ट्विटरवर याचा खुलासा केला होता. 

जावेद अख्तर यांना ‘शब्दांचे जादूगार’ म्हटले जाते.  फार कमी लोकांना ठाऊक असेल की त्यांचे खरे नावही जादू असेच आहे. यांचा जन्म १७ जानेवारी १९४५ रोजी ग्वाल्हेर येथे झाला होता.  त्यांचे  वडील जाँ निसार अख्तर एक प्रख्यात उर्दू शायर आणि गीतकार होते. त्यामुळे जावेद अख्तर यांना   कलेचा वारसा त्यांच्या कुटुंबातूनच मिळाला. 

१९६४ मध्ये जावेद अख्तर मुंबईत आले आणि मुंबईचेच झाले. याच मुंबईने जावेद अख्तर यांना ऐश्वर्य,प्रसिद्धी, ओळख असे सगळे काही मिळवून दिले. जावेद यांचे वडिलांसोबतचे नाते फारसे चांगले नव्हते. त्यामुळे वडिल एक प्रसिद्ध गीतकार असूनही जावेद अख्तर यांनी चित्रपटसृष्टीमध्ये स्वत:ची ओळख बनविण्यासाठी वडिलांची मदत घेतली नाही आणि म्हणूनचं त्यांच्या यशाचा मार्ग अनेक संघर्षांनी भरलेला राहिला.  1964मध्ये जावेद यांनी मुंबईमध्ये पहिलं पाऊल ठेवले होते. त्यावेळी त्यांचे वय होते ते केवळ 19 वर्षे. डोळ्यांत असंख्य स्वप्न होती. पण खिशात होते ते केवळ 27 रूपये. अशात ते फुटपाथवर झोपले.  अनेक रात्री उपाशी राहून त्यांनी काढल्या. मात्र हार मानली नाही. याचे कारण म्हणजे, डोळ्यांतल्या त्या स्वप्नांवर त्यांचा विश्वास होता.

 

 बॉलिवूडमध्ये पदार्पण करताना अवघे 27 रुपये घेऊन मुंबईत आलेल्या जावेद यांनी ‘शोले’ सिनेमाच्या स्क्रिनप्लेसाठी तब्बल 1 कोटी रुपयांची मागणी केली होती. तेव्हा पासून आपल्याला हवे ते मानधन मागण्याची प्रथा बॉलिवूडमध्ये सुरू झाली. त्यावेळी त्यांनी या सिनेमाचे नायक अमिताभ बच्चन यांच्यापेक्षाही जास्त मानधन घेतले होते. 

 

टॅग्स :जावेद अख्तर