बॉलिवूडचा सुप्रसिद्ध संगीतकार वाजिद खान यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. गत रविवारी 31 मे रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने बॉलिवूड शोकाकूल असताना सोशल मीडियावरचे काही युजर्स मात्र वाजिद यांच्या यांच्या निधनाची खिल्ली उडवताना दिसत आहेत. गीतकार जावेद अख्तर यांनी यावर तीव्र संताप व्यक्त केला आहे.वाजिद खान यांच्या निधनावर दु:ख व्यक्त करत जावेद अख्तर यांनी एक ट्विट केले होते, त्याच्या या ट्विटवर एका युजरने वादग्रस्त कमेंट केली आणि जावेद अख्तर भडकले. ‘वाजिदसारख्या प्रतिभावान संगीतकाराला मृत्यूने आपल्यापासून हिरावून घेतले, यावर विश्वास करणे कठीण आहे. खूप मोठी हानी, खूप दु:खद’, असे ट्विट जावेद अख्तर यांनी केले होते.
त्यांच्या या ट्विटवर एका युजरने वादग्रस्त कमेंट केली. ‘हो माहित नाही, कसा कोरोना झाला? अल्लाहच्या मुलांना तर कोरोना स्पर्शही करू शकत नाही, असे टिकटॉमवाले मौलवी म्हणतात,’ अशी कमेंट या युजरने केली. युजरची ही कमेंट वाचून जावेद अख्तर प्रचंड संतापले. त्यांनी या युजरला सडेतोड उत्तर दिले.
‘टिकटॉकवाले मौलवी काहीही बकवास करोत. पण तुझ्यात मानवता शिल्लक आहे की नाही? एक प्रतिभावान आणि तरूण व्यक्ती जगातून गेली आणि तु खिल्ली उडवतेस. दु:खद, कोणी इतक्या खालच्या स्तराला जाऊन कसे बोलू शकतं,’ अशा शब्दांत या युजरने जावेद यांनी उत्तर दिले.
रविवारी मध्यरात्रीनंतर 1च्या सुमारास वाजिद यांनी अंतिम श्वास घेतला होता. ते किडनीच्या आजाराने ग्रस्त होते, दोन महिन्यांपासून त्यांच्यावर उपचार सुरु होते, यातच आठवडाभरापूर्वी त्यांना कोरोनाने ग्रासले होते. यातच त्यांचा मृत्यू झाला. वाजिद यांची आई रजिया खान यांनाही कोरोनाची लागण झाली आहे. त्यांनाही रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.