Join us

‘पीएम- नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे पोस्टर पाहिल्यानंतर जावेद अख्तर यांना बसला हा धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: March 22, 2019 7:39 PM

पीएम- नरेंद्र मोदी या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये चित्रपटाशी निगडित असलेल्या सगळ्यांची नावे लिहिण्यात आलेली आहेत. या नावात जावेद अख्तर यांचे देखील नाव आहे.

ठळक मुद्दे‘पीएम- नरेंद्र मोदी’या चित्रपटाचे पोस्टर ट्वीट करून त्यांनी त्यासोबत लिहिले आहे की, या पोस्टरवर माझे नाव पाहून मला धक्काच बसला... कारण या चित्रपटातील कोणतीच गाणी मी लिहिलेली नाहीत.

‘पीएम- नरेंद्र मोदी’ या चित्रपटाचे पोस्टर पाहून गीतकार जावेद अख्तर यांना चांगलाच धक्का बसला आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये चित्रपटाशी निगडित असलेल्या सगळ्यांची नावे लिहिण्यात आलेली आहेत. या नावात जावेद अख्तर यांचे देखील नाव आहे. त्यामुळेच त्यांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. या चित्रपटाचे पोस्टर ट्वीट करून त्यांनी त्यासोबत लिहिले आहे की, या पोस्टरवर माझे नाव पाहून मला धक्काच बसला... कारण या चित्रपटातील कोणतीच गाणी मी लिहिलेली नाहीत. 

‘पीएम- नरेंद्र मोदी’ या बायोपिकमध्ये अभिनेता विवेक ओबेरॉय मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. हा ट्रेलर पाहिल्यानंतर ट्विटरवर प्रतिक्रियांचा पाऊस पडला होता. विवेकने मोदींच्या भूमिकेला जराही न्याय दिला नसल्याचे मत अनेक लोकांनी दिले होते. ‘ पीएम मोदी विवेकपेक्षा चांगले अभिनेते आहेत,’ असे एका युजरने लिहिले होत तर अनेक लोकांनी हा बायोपिक २०१९ चा बेस्ट कॉमेडी चित्रपट असणार असल्याची प्रतिक्रिया दिली होती. या ट्रेलरच्या निमित्ताने काही युजर्सनी निवडणूक आयोगाच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. ‘चित्रपटाच्या नावावर काहीही. निवडणूक आयोगाला हे दिसत नाहीये का?’ असा सवाल एका युजरने केला होता. पण काहींनी विवेकच्या अभिनयाचे कौतुक देखील केले होते. आम्ही हा चित्रपट पाहण्यास उत्सुक आहोत, अशा आशयाच्या अनेक प्रतिक्रियाही ट्विटरवर पाहायला मिळत होत्या.

येत्या ५ एप्रिलला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटात २०१४ मधील निवडणुका ते पंतप्रधानपदापर्यंतचा मोदींचा प्रवास दाखवला जाणार आहे. मेरी कोम आणि सरबजीत चित्रपटाचे दिग्दर्शक ओमंग कुमार यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. या चित्रपटात विविध दमदार राजकीय व्यक्तिरेखा पाहायला मिळणार आहेत. अभिनेता मनोज जोशी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांची भूमिका साकारणार आहेत. हिराबेन म्हणजेच मोदींच्या आईची भूमिका अभिनेत्री जरीना वहाब साकारणार आहे तर किशोरी शहाणे इंदिरा गांधी यांच्या भूमिकेत दिसणार आहे. अभिनेत्री बरखा बिष्ट ही मोदींच्या पत्नी जसोदाबेन यांची भूमिका पडद्यावर जिवंत करणार आहे.

टॅग्स :जावेद अख्तरपी. एम. नरेंद्र मोदी