बॉलिवूडचे दिग्गज गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांनी काही दिवसांपूर्वीच २६ नोव्हेंबर रोजी मुंबईवर झालेल्या हल्ल्याची आठवण करून देत जावेद अख्तर यांनी पाकिस्तानला आरसा दाखवला होता. आता त्यांनी उर्दू भाषेवरून पाकिस्तानला सुनावलं आहे. उर्दू भाषा ही पाकिस्तान वा इजिप्तची नाही तर 'हिंदुस्तान'ची भाषा आहे, असं ते म्हणाले.
जावेद अख्तर यांनी पत्नी शबाना आझमी यांच्यासोबत शायराना-सरताज या उर्दू शायरी अल्बम लॉन्च केला. या कार्यक्रमात ते बोलत होते. उर्दू अन्य कुठल्याही देशातून आलेली नाही. ती आमची भाषा आहे. आमच्या भारताची भाषा आहे. पाकिस्तानही भारताच्या फाळणीनंतर अस्तित्वात आला. याआधी हा देश केवळ भारताचा भाग होता. त्यामुळे उर्दू भाषा भारताच्या बाहेर बोलली जात नाही. पंजाबचं उर्दू भाषेत मोठं योगदान आहे आणि ही भारताची भाषा आहे. पण आपण ही भाषा का सोडली? पाकिस्तानमुळे? फाळणीमुळे? उर्दू भाषेवर आपण लक्ष द्यायला हवं. आधी फक्त हिंदूस्तानच होता. पाकिस्तान नंतर आला. आता पाकिस्तान म्हणतो की काश्मीर आमचं आहे. आपण हे मानणार आहाेत का? कधीच नाही... त्याचप्रमाणे उर्दू आपली भाषा आहे आणि ती आपण जपायला हवी. आजची नवी पिढी उर्दू व हिंदीपासून दूरावत चालली आहे. सगळ्यांना इंग्रजी हवी आहे. पण किमान हिंदी तरी आपण बोलायला हवी. कारण ती आपली राष्ट्रभाषा आहे, असं ते म्हणाले. भाषेचा संबंध कोणत्याही विशिष्ट धर्माशी नसतो तर तो क्षेत्रावर आधारित असतो. भाषेचा संबंध धर्माशी असता तर संपूर्ण युरोपात एकच भाषा बोलली गेली असती, असंही ते म्हणाले.
अलीकडे फैज फेस्टिव्हल 2023 मध्ये जावेद अख्तर यांनी मुंबईवरील हल्ल्यावरून पाकिस्तानला खडेबोल सुनावले होते. 'आम्ही नुसरत आणि मेहदी हसनसाठी मोठ्या कार्यक्रमांचं आयोजन केलं आहे. पण तुमच्या देशात लता मंगेशकर यांच्यासाठी कोणताही कार्यक्रम झाला नाही. जाऊद्या...आता एकमेकांना दोष देऊन फायदा नाही. आम्ही मुंबईचे लोक आहोत, आमच्या शहरावर हल्ला झालेला आम्ही पाहिला आहे. ते लोक नॉर्वेमधून किंवा इजिप्तमधून आले नव्हते. ते लोक अजूनही तुमच्या देशात फिरत आहेत. त्यामुळे ही तक्रार प्रत्येक भारतीयाच्या मनात असेल, तर तुम्हाला वाईट वाटण्याचे काम नाही,' असे जावेद अख्तर म्हणाले होते.