अभिनेत्री कंगना रणौत (Kangana Ranaut) आणि संगीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) यांच्यातील वादाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. 2020 मध्ये कंगनाने एका मुलाखतीत जावेद अख्तर यांच्या धमकी दिल्याचे आरोप लावले होते. सुरुवातीला जावेद यांनी दुर्लक्ष केले मात्र सुशांतसिंह राजपूतच्या निधनानंतर कंगनाने पुन्हा अख्तर यांच्यावर निशाणा साधला. त्यांनीच सुशांतला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप कंगनाने केला. यानंतर मात्र जावेद अख्तर कंगना विरोधात कोर्टात गेले. काल यावर सुनावणी झाली.
जावेद अख्तर यांनी कोर्टासमोर आपली बाजू मांडताना सांगितले,"मी लखनऊचा आहे आणि तिथे आम्हाला तू नाही तर आप असं बोला म्हणून शिकवलं जातं. माझ्याहून ३०-४० वर्ष छोटा जरी कोणी असेल तरी मी आप च म्हणतो. मी आजपर्यंत माझ्या वकीलासोबतही तू तू करुन बोललो नाही. मला धक्का बसलाय. जे काही आरोप माझ्यावर लावलेत ते खोटे आहेत."
ते पुढे म्हणाले,"२०२० मध्ये कंगनाने माझ्यावर हे आरोप लावले होते. काही महिन्यांनंतर जेव्हा सुशांतसिंहचं निधन झालं तेव्हा माध्यमात हीच चर्चा होत होती. तेव्हा मी काही प्रतिक्रिया दिली नाही. पण जेव्हा ती म्हणाली की मी सुशांतला सुसाईड करण्यास भाग पाडलं तेव्हा मी अपमानित झालो. त्याच्या निधनानंतर स्टार्सची आत्महत्या हा विषय चर्चेत होता आणि मी कलाकारांना आत्महत्या करण्यास उकसवतो आमचा ग्रुप आहे असं कंगना म्हणाली पण हे खोटं आहे."
काल झालेल्या या सुनावणीनंतर आता कंगना रणौतच्या वकिलांनी जावेद यांना प्रश्न विचारण्यासाठी 12 जून पर्यंत वेळ मागितला आहे.