Join us

"मुस्लिमांपेक्षा एकापेक्षा अधिक लग्न करणारे हिंदूच...", जावेद अख्तर यांचं विधान चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2024 12:13 PM

जावेद अख्तर यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा रंगली आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत UCC(युनिफॉर्म सिव्हिल कोड) बाबत भाष्य केलं आहे. 

बॉलिवूडमधील प्रसिद्ध गीतकार जावेद अख्तर त्यांच्या वक्तव्यांमुळे कायमच चर्चेत असतात.  ते बेधडक स्वभावामुळेही ओळखले जातात. समाजातील अनेक गोष्टींवर ते त्यांचं मत अगदी परखडपणे मांडतााना दिसतात. अनेकदा त्यांच्या वक्तव्यांमुळे वादही निर्माण झालेला आहे. आतादेखील जावेद अख्तर यांनी केलेल्या एका वक्तव्याची चर्चा रंगली आहे. त्यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत UCC(युनिफॉर्म सिव्हिल कोड) बाबत भाष्य केलं आहे. 

उत्तराखंडमध्ये  UCC लागू करण्यात आला आहे. याबाबत त्यांनी बरखा दत्तला दिलेल्या मुलाखतीत परखडपणे मत मांडलं. ते म्हणाले, "मी सुरुवातीपासून  UCC च्या समर्थनार्थ बाजू मांडली आहे. पण, केवळ एकाच राज्यात हे कसं काय लागू केलं जाऊ शकतं. हे केंद्र सरकारचं काम आहे. जर प्रत्येक राज्य त्यांचं वेगळं व्हर्जन लागू करणार असतील तर ते युनिफॉर्म कसं राहील? UCC द्वारे मुस्लीम धर्मियांसाठी हे लागू केलं जाऊ शकत नाही. एकापेक्षा जास्त लग्न करणाऱ्यांवर बंधन लावण्याची वेळ आली आहे. हे केवळ अल्पसंख्यांकांसाठी नाही तर सगळ्यांसाठी लागू केलं पाहिजे. कोणताही नियम लागू करण्याआधी त्यावर चर्चाही झाली पाहिजे. पण, असं झालेलं नाही." 

"जे  UCCबद्दल बोलत आहेत. त्यांना मला विचारायचं आहे की त्यांनी त्यांच्या मुलीला संपत्तीत अर्धा वाटा दिला आहे का? नसेल तर त्यांनी याबद्दल बोलू नये. सगळ्यांना समान कायदा असेल, तर मला काहीच प्रॉब्लेम नाही. मुस्लीम धर्मियांना चार पत्नी करण्याचा अधिकार आहे, म्हणून ते जळतात. UCC लावण्याचं फक्त हे एकच कारण आहे का? याचा अर्थ तुम्हालाही हा अधिकार असेल तर तुम्ही आनंदी व्हाल. पण, तुम्ही बेकायदेशीर पद्धतीने हे करत आहात," असंही ते पुढे म्हणाले. त्यांनी सरकारी आकड्यांचा आधार घेत मुस्लीम धर्मियांपेक्षा हिंदूंमध्ये एकपेक्षा अधिक विवाह केल्याच्या घटना जास्त असल्याचं त्यांनी सांगितलं. याबरोबरच महिल्यांच्या अधिकारांबद्दलही त्यांनी वक्तव्य केलं. UCCद्वारे महिलांना संपत्तीत वाटा मिळाला पाहिजे, असंही ते म्हणाले. 

टॅग्स :जावेद अख्तरमुस्लीमसेलिब्रिटी