लेखक, गीतकार जावेद अख्तर (Javed Akhtar) नेहमीच त्यांच्या विधानांमुळे चर्चेत असतात. तरुण असो किंवा प्रौढ मंडळी सर्वच वयोगटातील लोकांमध्ये ते मिसळून जातात. जावेद अख्तर यांचा मुलगा अभिनेता फरहान अख्तरचंही (Farhan Akhtar) इंडस्ट्रीत मोठं नाव आहे. फरहान गायक, गीतकार, कवी, दिग्दर्शक आणि निर्माताही आहे. मुलाला भेटायला जाण्यासाठी मला अपॉइंटमेंट घ्यावी लागते असं नुकतंच जावेद अख्तर म्हणाले.
जावेद अख्तर नुकतंच अमेरिकेत होते. तिथे त्यांनी 'जैदी चॅनल'ला मुलाखत दिली. ते म्हणाले, "माझं छोटं कुटुंब आहे. एक मुलगा, एक मुलगी, पत्नी शबाना आणि मी. मुलगी वेगळ्या घरात राहते, मुलगा वेगळं राहतो तर मी आणि पत्नी एकत्र राहतो. लहानपणी ऐकलं होतं की अमेरिका, इंग्लंडमध्ये नातेवाईक एकमेकांच्या घरी जाण्यासाठी आधी फोन करतात. तेव्हा आम्हाला याचं फार आश्चर्य वाटायचं. पण आता आम्हीही तेच आयुष्य जगत आहोत आणि हे ठीकही आहे. मी इथे आल्यावर अनेकांनी मला फरहानला का नाही आणलं असं विचारलं. तो काय बेरोजगार आहे का? त्याची भेट घेण्यासाठी मला आधी फोन करावा लागतो. ४-५ दिवसांनी आम्ही भेटण्याची वेळ ठरवतो. असं होणं स्वाभाविकच आहे. आता हेच आयुष्य आहे."
फरहान अख्तरने कालच त्याचा ५१ वा वाढदिवस साजरा केला. २०२२ मध्ये त्याने शिबानी दांडेकरशी लग्नगाठ बांधली. दोघंही त्यांचं वेगळं आयुष्य जगत आहेत. फरहान लवकरच '१२० बहादुर' सिनेमात दिसणार आहे. यावर्षीच्या शेवटी सिनेमा रिलीज होणार आहे. याशिवाय तो 'जी ले जरा' ची निर्मिती करणार आहे ज्यामध्ये आलिया भट, कतरिना कैफ आणि प्रियंका चोप्रा हे त्रिकुट पहिल्यांदाच एकत्र पाहायला मिळणार आहे. मात्र या सिनेमाबाबत पुढील अपडेट अद्याप आलेले नाही.