बॉलिवूडमधील दोन दिग्गज कलाकार म्हणजे अमिताभ बच्चन (amitabh bachchan) आणि शाहरुख खान (shahrukh khan). उत्तम अभिनयाच्या जोरावर या दोन्ही कलाकारांनी सिनेसृष्टीत त्यांचं हक्काचं स्थान निर्माण केलं आहे. आजवरच्या कारकिर्दीत या दोघांनीही अनेक सिनेमांमध्ये एकत्र स्क्रिन शेअर केली. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये ही जोडी फारशी एकत्र दिसली नाही. त्यामुळे या दोघांनी पुन्हा एकत्र यावं अशी चाहत्यांची इच्छा होती. विशेष म्हणजे चाहत्यांची ही इच्छा लवकरच पूर्ण होणार आहे. तब्बल १७ वर्षानंतर ही जोडी एकत्र पडद्यावर दिसणार आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, जवळपास १७ वर्षानंतर एकत्र येणार आहे. एका नव्या सिनेमामध्ये ही जोडी एकत्र झळकणार आहे. अद्याप तरी या सिनेमाचं नाव समोर आलं नसलं तरी या जोडीच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला आहे. तसंच शाहरुखनेदेखील ट्विट करत याविषयी माहिती दिली आहे.
"एवढ्या वर्षानंतर बिग बींसोबत पुन्हा काम करताना मज्जा आली. ते शुटिंगसाठी आले आणि डोक्यावर आशिर्वादाचा हात ठेवला. आणि, तुम्हाला हे सुद्धा सांगायचं ती त्यांनी धावण्याच्या शर्यतीमध्ये मला हरवलं", असं कॅप्शन देत शाहरुखने ही पोस्ट शेअर केली.
दरम्यान, यापूर्वी अमिताभ बच्चन आणि शाहरुख खान यांनी मोहब्बतें, कभी खुशी कभी गम, कभी अलविदा ना कहना यांसारख्या अनेक गाजलेल्या सिनेमांमध्ये एकत्र काम केलं आहे. त्यामुळे आता पुन्हा कोणत्या सिनेमात त्यांची जोडी जमणार हे जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक आहेत.