सोशल मीडियावर बॉलिवूडच्या टॉप कलाकारांची कायमच चर्चा रंगत असते. मात्र, आज एका साईड रोल करणाऱ्या अभिनेत्याची चर्चा रंगली आहे. जवान, पीपली लाइव अशा काही गाजलेल्या सिनेमांमध्ये झळकलेला ओंकार दास मानिकपुरी (Omkar das manikpuri) हा अभिनेता अनेकांच्या लक्षात असेल. जवान सिनेमात नत्था ही भूमिका साकारुन ओंकार दास विशेष प्रकाशझोतात आला. आज त्याला प्रत्येक प्रेक्षक ओळखतो. लहान लहान भूमिका साकारुन लोकप्रियता मिळवलेल्या ओंकार दास यांनी एकेकाळी प्रचंड हालअपेष्टा सहन केल्या आहेत. इतकंच नाही तर एक काळ असा होता जेव्हा त्यांची परिस्थिती इतकी बिकट होती की त्यांनी अनेक महिने चहाची चवदेखील चाखली नव्हती.
'जवान' सिनेमात ओंकार दास यांनी कर्जात बुडालेल्या शेतकऱ्याची भूमिका साकारली होती. यात कर्जाच्या डोंगराखाली दबलेल्या या शेतकऱ्याने अखेर आत्महत्या करत त्याचं जीवन संपवलं. विशेष म्हणजे पडद्यावर त्याने जी भूमिका साकारली आहे. तसंच काहीसं आयुष्य तो खऱ्या जीवनात जगला आहे.
इंडस्ट्रीमध्ये येण्यापूर्वी नत्था म्हणजेच ओंकार दास यांची परिस्थिती अत्यंत बिकट होती. दोन वेळच्या जेवणाचीही भ्रांत होती. इतकंच नाही तर त्यांची परिस्थिती इतकी वाईट होती की अनेक महिने ते साधा चहा सुद्धा पिऊ शकत नव्हते. त्यांच्या याच परिस्थितीमुळे त्यांच्या कुटुंबियांनीही त्यांच्याकडे पाठ फिरवली होती. परंतु, ओंकार दास यांनी हार मानली नाही. या कठीण काळातही ते खंबीरपणे उभे राहिले. याच प्रचंड इच्छाशक्ती आणि मेहनत करण्याची तयारी यांच्या जोरावर त्याने इंडस्ट्रीत नाव कमावलं. एका मुलाखतीमध्ये त्याने याविषयी भाष्य केलं आहे.
ओंकार दास यांनी त्यांच्या स्ट्रगलची गोष्ट एका मुलाखतीत सांगितली होती. "परिस्थिती हालाखीची असल्यामुळे मी पाचवीपर्यंत शिक्षण घेतलं. परिस्थिती इतकी वाईट होती की एकदा चहा प्यायल्यानंतर पुढचे कित्येक महिने तो पुन्हा प्यायला मिळत नव्हता. कारण, चहा घ्यायला पैसेच नसायचे. रेशन घेण्यासाठीही पैसे नसायचे. बऱ्याचदा तांदूळ संपायचे. तर, कधी महिनाभर भाजी मिळायची नाही अशी परिस्थिती होती", असं ओंकार दास म्हणाला.
पुढे तो सांगतो, "शाळा सुटल्यानंतर उदनिर्वाहासाठी इकडे-तिकडे काम करु लागलो, पथनाट्य आणि नाटकात नाच्या म्हणून काम केलं. किराणा दुकानात, कारखान्यात मिळेल ते काम केलं. वयाच्या १७ व्या वर्षी लग्न झाल्यामुळे कौटुंबिक जबाबदारी आणखीनच वाढली. पण, परिस्थितीत काहीच बदल झाला नव्हता."
दरम्यान, लवकरच तो अक्षय कुमारच्या मिशन रानीगंज या सिनेमात झळकणार आहे. त्याने २०१० मध्ये पीपली लाइव्ह या सिनेमातून इंडस्ट्रीत पदार्पण केलं. यापूर्वी ते नाटकांमध्ये स्त्री पात्राची भूमिका करायचे. ओंकार दास मानिकपुरी समाजातील असल्यामुळे ते मांसाहार करत नाही. मात्र, पीपली लाइव्ह सिनेमात त्यांना एका सीनमध्ये अंड खावं लागलं होतं. ज्यामुळे समाजातील लोकांनी त्यांना अपमानित केलं आणि समाजाच्या बाहेर काढलं. आजही ते समाजाच्या बाहेर असल्याचं त्यांनी सांगितलं.