बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेत्री आणि समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांचा उद्या 73वा वाढदिवस आहे. 1992 मध्ये जया बच्चन यांना पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. जयाने 9 फिल्मफेअर पुरस्कार जिंकले आहेत. जया बच्चन यांनी वयाच्या पंधराव्या वर्षापासून फिल्मी जगात पाऊल ठेवले. 1963 सत्यजित रे यांच्या महानगर चित्रपटात त्यांनी सहायक भूमिका साकारली होती. जया बच्चन यांनी 1972 मध्ये 'बन्सी बिरजू' चित्रपटात अमिताभ बच्चन यांच्यासोबत पहिल्यांदा काम केले होते.
अमिताभ बच्चन आणि जया बच्चन बॉलिवूडमधले एक आदर्श जोडपे आहे. या कपलची लव्हस्टोरी ही तितकीच इंटरेस्टिंग आहे. अमिताभ व जया यांची पहिली भेट ‘गुड्डी’च्या सेटवर झाली होती. ऋषीकेश मुखर्जी यांनी अमिताभ आणि जया यांची भेट घालून दिली होती. अमिताभ पहिल्याच नजरेत जया यांच्या प्रेमात पडले होते. पण जया यांना अमिताभ जराही आवडले नव्हते. अर्थात नंतर दोघांमध्ये चांगली मैत्री झाली.
यानंतर ‘बावर्ची’च्या सेटवर अमिताभ व जया यांचे प्रेम बहरले. या चित्रपटात जया व राजेश खन्ना लीड रोलमध्ये होते. पण अमिताभ यांना जया यांचा दुरावा सहन होईना. ते रोज ‘बावर्ची’च्या सेटवर जया यांना भेटायला जात.
1973 मध्ये अमिताभ व जया यांनी ‘जंजीर’मध्ये एकत्र काम केले. याच चित्रपटादरम्यान दोघांनी लग्नाचा निर्णय घेतला होता. ‘जंजीर’ हिट झाला तर सर्वजण मिळून लंडनमध्ये फिरायला जाऊ, असे ‘जंजीर’च्या टीमने ठरवले होते. यात अमिताभ व जया हे दोघेही होते.
जंजीर’ हिट झाला आणि अमिताभ यांनी लंडनला जाण्याची तयारी सुरु केली. तत्पूर्वी वडील हरिवंशराय यांची परवानगी घेण्यासाठी ते गेले. लंडनचे नाव ऐकताच कोण कोण जाणार, असा प्रश्न हरिवंशराय यांनी अमिताभ यांना केला आणि जया यांचे नाव ऐकताच त्यांनी नकार दिला. जयासोबत जायचे असेल तर आधी तिच्यासोबत लग्न कर. लग्न न करता मी तुला जयासोबत जाऊ देणार नाही, असे हरिवंशराय म्हणाले अमिताभ वडिलांचे शब्द टाळू शकत नव्हते. अखेर त्यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. मग काय घाईघाईत अगदी 24 तासांत जया व अमिताभ यांचे लग्न झाले. या लग्नाला केवळ पाच व-हाडी हजर होते. यानंतर दुस-याच दिवशी जया व अमिताभ लंडनसाठी रवाना झालेत.