जया बच्चन ‘कमबॅक’साठी सज्ज, पहिल्यांदाच मराठी चित्रपटात करणार काम
By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2021 02:16 PM2021-02-17T14:16:52+5:302021-02-17T14:17:13+5:30
7 वर्षांपूर्वी रितुपर्णो घोष यांच्या ‘सनग्लास’ या सिनेमात जया अखेरच्या दिसल्या होत्या. यात त्यांनी पहिल्यांदा नसीरूद्दीन शहासोबत काम केले होते. खास बात म्हणजे, हा सिनेमा कधी रिलीजच झाला नाही.
बॉलिवूडच्या ज्येष्ठ अभिनेत्री जया बच्चन अॅक्टिंग सोडून पूर्णवेळ राजकारणात रमल्या आहेत. 1973 साली त्यांनी अमिताभ बच्चन यांच्याशी लग्न केले आणि लग्नानंतर चित्रपटांपासून काहीशा दूर गेल्यात. काही मोजके चित्रपट वगळता त्या सिनेसृष्टीत फारशा झळकल्या नाहीत. 2013 साली प्रदर्शित झालेल्या ‘सनग्लास’ या चित्रपटात त्या शेवटच्या झळकल्या होत्या. पण आता तब्बल 7 वर्षांनंतर जया बच्चन कमबॅकसाठी सज्ज झाल्या आहेत. होय, ते सुद्धा एका मराठी चित्रपटातून.
होय, शी द पीपल या वेबसाईटने दिलेल्या वृत्तानुसार, जया बच्चन लवकरच एका मराठी सिनेमात झळकणार आहेत. हा त्यांचा पहिला मराठी सिनेमा असेन. अनुमती, पोस्टकार्ड, अनवट, बायोस्कोप यांसारख्या अनेक सुपरहिट मराठी चित्रपटांचे दिग्दर्शक गजेंद्र अहिरे यांच्या सिनेमात जया दिसणार आहे. या सिनेमाचे नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. अद्याप जया वा मेकर्सकडून याबाबत कुठलीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र ही बातमी वाचून जया बच्चनचे चाहते आनंदात आहेत.
7 वर्षांपूर्वी रितुपर्णो घोष यांच्या ‘सनग्लास’ या सिनेमात जया अखेरच्या दिसल्या होत्या. यात त्यांनी पहिल्यांदा नसीरूद्दीन शहासोबत काम केले होते. खास बात म्हणजे, हा सिनेमा कधी रिलीजच झाला नाही. 2016 मध्ये ‘की अँड का’या सिनेमात त्यांनी कॅमिओ रोल केला होता. यानंतर त्या कोणत्याही सिनेमात दिसल्या नाहीत.
जया बच्चन यांनी चार दशकांचा काळ गाजविला आहे. वयाच्या 15 व्या वर्षी त्यांनी बॉलिवूड इंडस्ट्रीत पाऊल ठेवले आणि यानंतर कधीच मागे वळून पाहिले नाही. पाठीवर रूळणारे लांबसडक केस आणि हसण्याचा एक वेगळा अंदाज यामुळे त्यांनी पे्रक्षकांना त्यांनी भुरळ घातली.1971 मध्ये जया बच्चन यांचा ‘गुड्डी’ हा सिनेमा हिट झाला आणि यानंतर एकामागून एक अनेक सिनेमे केले. पुढे त्यांनी राजकारणातही प्रवेश केला.
जया बच्चन यांचा पहिला चित्रपट बंगाली होता. या चित्रपटाचे नाव होते, ‘महानगर’. यावेळी जया केवळ 15 वर्षांच्या होत्या. ‘महानगर’नंतर जया बच्चन यांनी अनेक बंगाली चित्रपटांत काम केले. 1971 मध्ये त्यांना बॉलिवूडमध्ये ब्रेक मिळाला. त्यांच्या पहिल्या बॉलिवूड चित्रपटाचे नाव होते, ‘गुड्डी’. हा सिनेमा सुपरडुपर हिट झाला आणि यानंतर जया मुंबईला शिफ्ट झाल्यात.