बॉलिवूड अभिनेता शाहिद कपूरच्या चाहत्यांची निराशा करणारी एक बातमी आहे. शाहिदचा आगामी सिनेमा ‘जर्सी’चे शूटींग लांबणीवर पडले आहे. ‘कबीर सिंग’नंतर शाहिद ‘जर्सी’ या चित्रपटासाठी सज्ज झाला होता. आपल्या आवडत्या हिरोचा आणखी एक जबरदस्त परफॉर्मन्स पाहायला मिळणार म्हणून चाहतेही खूश होते. पण आता चाहत्यांना काही काळ प्रतीक्षा करावी लागणार आहे. होय, शाहिदची प्रकृती ठिक नसल्याने या चित्रपटाचे शूटींग लांबणीवर टाकण्यात आल्याचे कळतेय.
पिंकविलाने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून शाहिदची प्रकृती ठीक नाही. डॉक्टरांनी त्याला काही काळ कम्प्लीट बेड रेस्ट करण्याचा सल्ला दिला आहे. सगळे प्रोजेक्ट तूर्तास थांबवण्याचाही सल्लाही त्याला देण्यात आला आहे. त्यामुळे ‘जर्सी’चे शूटींगच्या तारखा पुढे ढकलण्यात आल्या आहे.
तब्येत खराब असताना अलीकडे शाहिदने एका अवार्ड फंक्शनला हजेरी लावली होती. शाहिदच्या जवळच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहिद शब्दाचा पक्का आहे. त्यामुळे डॉक्टरांनी मनाई केल्यानंतरही त्याने अवार्ड सेरेमनीला हजेरी लावली. मात्र यानंतर त्याची तब्येत आणखीच बिघडली. आता मात्र शाहिद पूर्णपणे विश्रांती घेतोय. त्यामुळे ‘जर्सी’चे शूटींग एक आठवड्यानंतर सुरु होईल.‘जर्सी’चे निर्माते अमन गिल यांनीही या वृत्ताला दुजोरा दिला आहे. शाहिद आपल्या कामाप्रती प्रचंड सजग आहे. पण गेल्या काही दिवसांपासून त्याची प्रकृती बिघडली आहे. निश्चितपणे त्याची प्रकृती आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाची आहे. तो पूर्णपणे बरा झाल्यानंतरच ‘जर्सी’चे शूटींग सुरु होईल, असे त्यांनी सांगितले.
‘जर्सी’ हा सिनेमा साऊथ चित्रपटाचा रिमेक आहे. हा चित्रपट गौतम तिन्नामुरी दिग्दर्शित करत आहेत. मृणाल ठाकूर या चित्रपटात शाहिदच्या अपोझिट दिसणार आहे. शाहिदचे पापा पंकज कपूरही यात कोचची भूमिका साकारताना दिसणार आहेत.