प्रसिद्ध पंजाबी अभिनेता अमन धालिवाल याच्यावर अमेरिकेत प्राणघातक हल्ला करण्यात आला आहे. जीममध्ये वर्कआऊट करत असताना त्याच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यात तो जबर जखमी झाला आहे. या घटनेचा व्हिडीओ नुकताच समोर आला आहे. हा व्हिडीओ खुद्द अमन यानेच ट्विटरवर शेअर करत माहिती दिली आहे.
अमेरिकेत एका जीममध्ये एक व्यक्ती हातात चाकू धरुन जीममध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला रोखत होता. तसंच त्यांना धमकावतही होता. या हल्लेखोराची नजर चुकवून अमनने त्याला जमिनीवर पाडलं आणि त्याच्या हातातला चाकू घेण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात अमन आणि हल्लेखाराची झटापट झाली. यात हल्लेखोराने अमनवर वार केले आहेत.अमनने या हल्लेखोराला खाली पाडल्यानंतर जीममधील इतर लोकांनीही त्या हल्लेखोराला पकडून ठेवलं त्यानंतर याविषयी पोलिसांना माहिती दिली.
अमेरिकेतील ३६८५ ग्रँड ओक्स स्थित प्लॅनेट फिटनेस जीममध्ये सकाळी ९ वाजून २० मिनिटांनी हा हल्ला झाल्याचं सांगण्यात येतं. या हल्ल्यात जखमी झाल्यानंतर अमन धालिवाल याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
दरम्यान, मीडिया रिपोर्टनुसार, जीममधील या हल्ल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी हल्लेखोराला ताब्यात घेतलं आहे. अभिनेता अमन धालिवाल याने पंजाबीसह बॉलिवूडमध्येही काम केलं आहे. ‘जोगिया वे जोगिया तेरी जोगन हो गया आन’ या गाण्यामुळे त्याला प्रसिद्धी मिळाली. विशेष म्हणजे त्याने हृतिक रोशन व ऐश्वर्या राय यांच्या ‘जोधा अकबर’ चित्रपटातही काम केलं आहे. तसंच ‘एक कुड़ी पंजाब दी’ आणि ‘विरसा’ या चित्रपटांमुळे त्याला लोकप्रियता मिळाली.