बॉलिवूडमधील सर्वात प्रतिष्ठित मानला जाणारा फिल्मफेअर पुरस्कार यंदा गुजरातमध्ये पार पडणार आहे. दरवर्षा मुंबईत होणार फिल्मफेअर सोहळा गुजरातमध्ये होणार असल्याने नाराजीचा सूर उमटला आहे. महाराष्ट्रातील तीन महत्त्वाच्या प्रोजेक्टनंतर फिल्म फेअरही गुजरातला नेल्याने सर्वच स्तरातून प्रतिक्रिया उमटत आहेत. राष्ट्रवादी (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्यानंतर आता जितेंद्र आव्हाड यांनीही याबाबत ट्वीट केलं आहे.
फिल्मफेअर सोहळा गुजरातमध्ये पार पडणार असल्यामुळे नवं राजकारण रंगताना दिसत आहे. जितेंद्र आव्हाड यांनी ट्वीट करत नाराजी व्यक्त केली आहे.
जितेंद्र आव्हाड ट्वीटमध्ये काय म्हणाले?
भारतीय चित्रपटसृष्टी आणि मुंबई यांचे नाते जवळ-जवळ १०० वर्ष जुने आहे. याच मुंबईत अनेक कलावंत, गायक, अनेक चित्रपट, अनेक गाणी तयार झाली. भारतातील सर्वाधिक सिनेमागृहे याच शहरात होती. पाकिस्तानातून विस्थापित झालेल्या कुटुंबाने याच चित्रपटसृष्टीतून कोट्यवधी रूपये कमावले.
भाजीपावच्या गाडीवर काम करणारा अक्षय कुमार याला या मातीचा स्पर्श होताच तो अब्जाधीश झाला. किती नावे घ्यावीत; घेऊ तेव्हढी कमीच आहेत. या मराठी मातीच्या परिसस्पर्शामुळे चित्रपटसृष्टीची भरभराट होत गेली. निदान या कलाकारांनी तरी या मातीची ओळख ठेवायला हवी होती.
फिल्मफेअर अॅवाॅर्ड मुंबईतून हलवला जात आहे. त्याविरोधात एकही कलावंत ब्र उच्चारण्यास तयार नाही. म्हणजेच, मराठी मातीचा उपयोग फक्त या लोकांनी स्वतःचे खिसे भरण्यापुरतेच केला. एकेकाची घरे शंभर-दीडशे कोटींची आहेत. त्यांनी हे पैसे मेहनतीने कमावले. पण, या मातीतूनच कमावले, हेदेखील महत्वाचे आहे. थोडी तरी या शहराबद्दल प्रेम-आपुलकी असती तर एखादा कलाकार तरी बोलला असता. पण, कोणी बोलेल, असे दिसत नाही.
१०५ हुतात्म्यांनो, माफ करा आम्हाला! तुम्ही अतिशय मेहनतीने मुंबई महाराष्ट्राला दिली. या मुंबईने देशाला पोसले. या मुंबईने आंतरराष्ट्रीय प्रतिमा निर्माण केली; जगात एक स्वतःची ओळख निर्माण केली. त्या मुंबईचे महत्त्व कमी करण्याचे काम जर झालं असेल आणि आम्ही मराठी माणूस, मग तो कुठल्याही जाती-धर्माचा का असेना तो जर शांत बसत असेल तर तुम्हा हुतात्म्यांना नक्कीच वाटत असेल की, आम्ही कशाला छातीवर गोळ्या झेलल्या? माफ करा आम्हाला !
69 वा ह्युंडाई फिल्मफेअर पुरस्कार सोहळा 2024 यंदा गुजरातच्या गांधीनगर गिफ्ट सिटी येथे २७ आणि २८ जानेवारी असे दोन दिवस रंगणार आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही बॉलिवूडमधील सिनेतारकांची गर्दी सोहळ्याला होणार आहे. 'गुजरात टुरिझम'च्या सहकार्याने हा सोहळा पार पडणार आहे.2020 चा अपवाद वगळता आातापर्यंत फिल्मफेअर पुरस्कार सोहळा महाराष्ट्रातच झाला आहे.