सध्या 'JNU - जहांगीर नॅशनल युनिवर्सिटी' या बॉलिवूड सिनेमाची सर्वत्र चर्चा आहे. उर्वशी रौतेला मुख्य भूमिकेत असलेल्या या सिनेमाचं पोस्टर काहीच दिवसांपूर्वी प्रदर्शित करण्यात आलं होतं. आता या सिनेमाचा टीझर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या सिनेमातून एका गंभीर मुद्द्यावर भाष्य करण्यात आलं आहे. कॉलेज विद्यार्थ्यांची रोमँटिक नव्हे तर राजकीय विचारधारेची बाजू या सिनेमातून मांडण्यात आली आहे.
'JNU - जहांगीर नॅशनल युनिवर्सिटी' सिनेमाच्या १ मिनिटाच्या टीझरमध्ये काही महत्त्वाची दृश्ये दाखविण्यात आली आहेत. यामध्ये युनिवर्सिटीमधील विद्यार्थी आंदोलन करताना दिसत आहेत. "जेएनयू मै सरकार जिसकी होगी, देश का फ्युचर वही डिसाइड करेगा", "यहा के मगरमच्छ हम है, इसलिए हमारे साथ रहने मे ही समझदारी है" अशा घोषणा देत असल्याचं टीझरमध्ये पाहायला मिळत आहे. या टीझरमुळे सिनेमाबाबत प्रेक्षकांची उत्सुकता वाढली आहे.
या सिनेमात मराठमोळा अभिनेता सिद्धार्थ बोडकेही झळकणार आहे. 'JNU - जहांगीर नॅशनल युनिवर्सिटी' सिनेमाच्या टीझरमध्ये सिद्धार्थची झलक पाहायला मिळत आहे. सिद्धार्थने या सिनेमात युनिव्हर्सिटीमधील एका विद्यार्थ्याची भूमिका साकारली आहे. टीझरमध्ये तो आक्रमक भूमिकेत दिसत आहे. सिद्धार्थबरोबरच या सिनेमामध्ये अभिनेत्री रश्मी देसाईदेखील महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. ५ एप्रिलला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे.