अभिनेता जॉन अब्राहमचा (John Abraham) 'द डिप्लोमॅट' सिनेमा १४ मार्च रोजी रिलीज होत आहे. डिप्लोमॅट जितेंद्र पाल सिंह यांच्यावर सिनेमा आधारित आहे. यामध्ये जॉन त्यांचीच भूमिका साकारत आहे. सिनेमात पाकिस्तानात राहणाऱ्या उज्मा अहमद या भारतीय मुलीच्या सुटकेची गोष्ट दाखवण्यात आली आहे. जॉनने नुकतंच एका मुलाखतीत सिनेमाचा अनुभव सांगितला. तसंच तो जेपी सिंह यांना दोन वेळा भेटला आहे असंही तो म्हणाला.
सिनेमाची कथा काय आहे?
दिल्लीची रहिवासी असलेली उज्मा अहमद या मुलीची इंटरनेटवरुन पाकिस्तानच्या ताहिरशी ओळख होते. ताहिर मलेशियात टॅक्सी ड्रायव्हर असतो. तो तिला तिकडे नोकरी असल्याचं सांगतो. त्याचं ऐकून उज्मा मलेशियाला जाते. काही दिवसांनी ती नातेवाईकांना भेटण्यासाठी पाकिस्तानला जाते. तिथे तिची ताहिरशी भेट होते. तो तिला झोपेच्या गोळ्या देतो आणि जीवे मारण्याची धमकी देत तिच्याशी बळजबरी निकाह करतो. भारतात परत येण्यासाठी उज्मा खूप प्रयत्न करते आणि इंडियन एम्बसीमध्ये पोहोचते. तिथे जे पी सिंह तिची मदत करतात. सत्य घटनेवर हा सिनेमा आधारित आहे.
सिनेमाबाबतीत दैनिक भास्करला दिलेल्या मुलाखतीत जॉन अब्राहम म्हणाला, "मला सिनेमाचं नावच खूप आवडलं तिथेच मी होकार दिला होता. जिओ पॉलिटिक्समध्येही मला रस आहे. स्क्रीप्टही आवडली. मी जे पी सिंह यांना दोन वेळा भेटलो. ते खूपच साधे, सरळ आहेत. ते आमच्या सेटवरही आले होते. त्यांच्यात आणि माझ्या दोन साम्य आहेत. त्यांच्यासारखंच मला चेस खेळ आवडतो. मीही चार पावलं पुढचा विचार करत असतो. तसंच मी खूप अॅनालिटिकल आहे. एक डिप्लोमॅटही तसाच असतो प्रत्येक गोष्टीचा बारकाईने अभ्यास करणारा असतो. बाकी मला बॉडी लँग्वेजवरच जरा काम करावं लागलं. टीमसोबत यावर आम्ही खूप मेहनत घेतली."
'द डिप्लोमॅट' सिनेमाचं दिग्दर्शन शिवम नायर यांनी केलं आहे. अभिनेत्री सादिया खातिबने सिनेमात उज्माची भूमिका साकारली आहे.