अभिनेता जॉन अब्राहम (John Abraham) सध्या आगामी 'वेदा' सिनेमामुळे चर्चेत आहे. यामध्ये तो पुन्हा एकदा अॅक्शन अवतारात दिसत आहे. त्याच्यासोबत शर्वरी वाघचीही धाँसू भूमिका आहे. जॉन गेल्या एका दशकापासून फिल्म इंडस्ट्रीत काम करतोय. पण अजूनही निर्मात्यांचा त्यावर पूर्ण विश्वास नाही असा खुलासा त्याने केला. 'बाटला हाऊस','मद्रास कॅफे' असे हिट सिनेमे देऊनही त्याला निर्मात्यांचं सहकार्य मिळत नाही.
Ranveer Allahbadia ला दिलेल्या मुलाखतीत जॉन म्हणाला, "मी आजही फंडिंग आणि बजेटसाठी फिल्म इंडस्ट्रीत संघर्ष करत आहे. विक्की डोनर सारख्या सिनेमाची मी निर्मिती केली. इंडस्ट्रीला चांगले सिनेमे देऊनही मला स्टुडिओ हेड्सकडे फंड्ससाठी विनवणी करावी लागते. माझा प्रत्येक सिनेमा हा वेगळा असतो त्यामुळे स्टुडिओ हेड्सने ते समजून घ्यावं असं मला वाटतं. मात्र आजही या लोकांना माझ्यावर १०० टक्के विश्वास नाही. ते मला म्हणतात की माझ्या सिनेमाचं बजेट खूप जास्त आहे."
तो पुढे म्हणाला, "स्टुडिओ हेड्स माझ्या मेसेजला रिप्लाय देत नाहीत. मी व्हॉट्सअॅपचा वापर करत नाही. त्यामुळे जर मी कोणाला मेसेज केला तर तो मला रिप्लायच देत नाही. यात बराच काळ जातो पण रिप्लाय येत नाही. मी एका स्टुडिओ हेडला मेसेज केला होता तेव्हा त्याने मला लिहिले की मी रिप्लाय करेन. साडेचार महिने झालेत अजून त्याचा रिप्लाय आलेला नाही. मला याचं वाईट वाटत नाही पण एक रिप्लाय तर मी डिझर्व्ह करतो. लोकांनी माझ्यावर थोडा विश्वास दाखवला तर मी भारतीय सिनेमात चांगले बदल आणण्यात नक्कीच हातभार लावू शकतो. मी असं म्हणणार नाही की मी गेम चेंजर आहे पण मी प्रयत्न नक्कीच करेन."