Join us

जॉन अब्राहमच्या नव्या सिनेमाची घोषणा, या अभिनेत्रीसोबत पुन्हा दिसणार अ‍ॅक्शन अंदाजात

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2024 13:41 IST

'पठाण'नंतर तब्बल एक वर्षाने जॉन अब्राहमच्या नवीन सिनेमाची घोषणा झालीय

पिळदार शरीरयष्टी आणि दमदार अभिनयाच्या जोरावर जॉन अब्राहमनेबॉलिवूडमध्ये त्याचं स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. जॉनचे सिनेमे पाहणं ही अ‍ॅक्शनप्रेमी रसिकांसाठी एक पर्वणी असते. जॉनने २०२३ मध्ये शाहरुख खानसोबत 'पठाण' सिनेमात अभिनय केला. 'पठाण'मध्ये जॉनने खलनायकी भूमिका साकारली असली तरीही जॉनच्या अभिनयाचं खूप कौतूक झालं. अशातच जॉनच्या चाहत्यांसाठी आनंदाची बातमी. जॉनच्या नवीन सिनेमाची आज घोषणा झालीय. या सिनेमाच्या माध्यमातून जॉन पुन्हा एकदा अ‍ॅक्शन करताना पाहायला मिळणार आहे.

जॉन अब्राहमने इन्स्टाग्रामवर त्याच्या आगामी सिनेमाचं पोस्टर शेअर केलं. 'वेदा' असं या नवीन सिनेमाचं नाव आहे. 'वेदा' सिनेमाचे दोन पोस्टर रिलीज झाले आहेत. एका पोस्टरमध्ये जॉन पाठमोरा दिसत असून त्याच्या मागे बंदूक लटकवल्या आहेत. तर दुसऱ्या फोटोत जॉन रागात पाहत असून त्याच्यामागे अभिनेत्री शर्वरी वाघ घाबरलेल्या अवस्थेत पाहायला मिळतेय. जॉनच्या नवीन सिनेमातील दमदार लूकला चाहत्यांचं चांगलंच प्रेम मिळतंय.

"तिला एका रक्षणकर्त्याची गरज होती. तिला एक हत्यार सापडलं", असं कॅप्शन देत जॉनच्या 'वेदा' सिनेमाचं पोस्टर शेअर करण्यात आलंय. निखिल अडवाणी या सिनेमाचं दिग्दर्शन करत आहेत. हा सिनेमा १२ जुलै २०२४ ला थिएटरमध्ये रिलीज होणार आहे. जॉनचे चाहते पुन्हा एकदा त्याला अ‍ॅक्शन अंदाजात बघायला कमालीचे उत्सुक आहेत. जॉनने याआधी 'सत्यमेव जयते', 'सत्यमेव जयते 2', 'फोर्स', 'फोर्स 2', 'पठाण' अशा सिनेमांमधून दमदार अ‍ॅक्शन भूमिका साकारल्या आहेत.

टॅग्स :जॉन अब्राहमबॉलिवूड