जॉनी लिव्हर एक सुप्रसिद्ध कॉमेडियन आहेत. गेली कित्येक वर्ष ते प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करत आहेत. अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं आहे. वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवतच जेमी लिव्हरही अभिनयात तिचं नशीब आजमावत आहे. पण, जेमीला इतर स्टारकिडप्रमाणे प्रसिद्धी मिळाली नाही. सुपरस्टारची मुलगी असूनही तिला इंडस्ट्रीत नाव बनवण्यासाठी खूप स्ट्रगल करावा लागला. रंगरुपावरुनही जेमीला इंडस्ट्रीत बोललं गेलं होतं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत तिने याचा खुलासा केला आहे.
जेमीने नुकतीच छवी मित्तल पॉडकास्टमध्ये हजेरी लावली होती. यावेळी जेमीला याबाबत विचारण्यात आलं. याचा तुझ्या आत्मविश्वासावर परिणाम झाला का? असा प्रश्नही जेमीला विचारण्यात आला. याचं उत्तर देताना जेमीने तिच्यासोबत घडलेला एक प्रसंग सांगितला. एका मेकअप आर्टिस्टने जेमीच्या नाकावर कमेंट केली होती. नाक मोठं आहे, कापावं लागेल, असं ती म्हणाली होती. हे ऐकताच जेमीच्या पायाखालची जमीनच सरकली.
"एक दिवस मी फोटोशूट करत होते. तेव्हा तिथली मेकअप आर्टिस्ट म्हणाली की हिचं नाक खूपच मोठं आहे. कापावं लागेल. यामुळे तुमचा आत्मविश्वास कमी होतो. असं वाटतं की तुम्ही कधीच चांगले दिसू शकत नाही", असं जेमी म्हणाली. जेमीला लहानपणापासून लठ्ठपणाचा सामना करावा लागत असल्याचंही तिने सांगितलं.