जॉनी लिव्हर आज बॉलिवूडमधील सगळ्यात प्रसिद्ध कॉमेडीयन मानला जातो. गेल्या २५-३० वर्षांपासून तो एकाहून एक हिट चित्रपट बॉलिवूडला देत आहे. जॉनी लिव्हर आज एक यशस्वी विनोदी अभिनेता असला तरी त्याने हे यश मिळवण्यासाठी खूप स्ट्रगल केले आहे. जॉनीने त्याच्या अभिनयाच्या जोरावर आज बॉलिवूडमध्ये त्याचे एक स्थान निर्माण केले आहे. जॉनीने गेल्या काही वर्षांत प्रसिद्धी, पैसा मोठ्या प्रमाणावर मिळवला आहे. जॉनीचे सगळे बालपण झोपडपट्टीत गेले. पण आज अंधेरीतील एका पॉश एरियात जॉनी थ्री बीएचकेच्या घरात राहातो. एवढेच नव्हे तर या घरासोबतच त्याचे अनेक फ्लॅट्स आहेत. त्याचे अंधेरीतील हे घर अतिशय आलिशान असून घरात प्रवेश केल्या केल्या तुम्हाला भिंतीवर चार्लिन चॅप्लिनचे अनेक स्केचेस पाहायला मिळतात. जॉनी या घरात त्याची पत्नी, मुलगी आणि मुलासोबत राहातो.
जॉनीने त्याच्या स्ट्रगलविषयी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत सांगितले होते की, मी माझ्या घरातील सगळ्यात मोठा मुलगा होतो. माझ्या घरची परिस्थिती चांगली नसल्याने मला सातवीतच शाळा सोडावी लागली. माझ्या वडिलांची कमाई खूप कमी असल्याने मी बाराव्या वर्षापासून नोकरी करायला सुरुवात केली. मी सहा वर्षं एका कंपनीत काम केले. तिथे मला खूपच कमी पैसे मिळायचे. पण कुटुंबाला हातभार लागतोय असा विचार करून मी हे काम करत होतो. मी लहानपणापासूनच आजूबाजूच्या लोकांना पाहून मिमिक्री करत असे. त्यामुळे नोकरी करत असतानाच मी मिमिक्री शो देखील करायला लागलो. असाच एक शो करताना कल्याणजी-आनंदजी यांना भेटण्याची मला संधी मिळाली. त्यांना माझी मिमिक्री खूप आवडल्याने त्यांनी मला त्यांच्यासोबत शो करण्याची संधी दिली. त्यामुळे मी त्यांच्यासोबत परदेशातही शो करायला लागलो. १९८० पासून मी शो करत होतो. शो मध्ये लोकांना माझी मिमिक्री आवडत असली तरी मला चित्रपटात घ्यायला कोणी तयार नव्हते. १९९२ मध्ये मला बॉलिवूडमध्ये पहिला ब्रेक मिळाला. मला मिळालेल्या संधीचे मी सोने केले आणि त्यानंतर अनेक चित्रपटांमध्ये खूप चांगल्या भूमिका साकारल्या. प्रेक्षकांनी अक्षरशः मला डोक्यावर घेतले. मला फिल्मफेअरचे अनेक पुरस्कार देखील मिळाले.