Join us

जॉनी वॉकर यांचा लहान भाऊ विजय कुमार यांचे निधन, या चित्रपटांत केले होते काम

By ऑनलाइन लोकमत | Published: April 05, 2020 2:54 PM

मधुबालांशी होते कनेक्शन...

ठळक मुद्दे सिनेसृष्टीत ते विजय कुमार या नावाने वावरले. पण त्यांचे खरे नाव वहीद काजी होते. 

लाखो प्रेक्षकांच्या चेह-यावर हास्य फुलवणारे दिग्गज हास्य अभिनेते जॉनी वॉकर यांचे लहान बंधू विजय कुमार यांचे निधन झाले. ते 79 वर्षांचे होते. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचे निधन झाल्याचे कळते. विजय कुमार यांची आणखी एक ओळख द्यायची झाल्यास, ते दिग्गज अभिनेत्री मधुबाला यांचे मेहुणे होते.

त्यांच्या कुटुंबातील एका सदस्याने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी रात्री उशीरा त्यांचे मुंबईतील राहत्या घरी निधन झाले. त्यांची प्रकृती तशी उत्तम होती. ते रोज नियमितपणे व्यायाम करत, फिरायला जात. फिटनेसबद्दल ते अतिशय जागरूक होते. असे असताना अचानक हृदयविकाराचा धक्का आला आणि त्यांचे निधन झाले.विजय कुमार यांनी 1961 साली प्रदर्शित ‘वॉन्टेड’,1963 साली प्रदर्शित ‘कौन अपना कौन पराया’ या सिनेमांमध्ये काम केले होते. ‘कौन अपना कौन पराया’ या सिनेमात त्यांच्यासोबत वहिदा रहमान, निरूपा रॉय आणि जॉनी वॉकर मुख्य भूमिकेत होते. 1966 साली ‘दिल्लगी’ या रोमॅन्टिक सिनेमातही ते होते.

 सिनेसृष्टीत ते विजय कुमार या नावाने वावरले. पण त्यांचे खरे नाव वहीद काजी होते. त्यांचे मोठे बंधू जॉनी वॉकर यांचे खरे नावही बदरूद्दीन जमालुद्दीन काजी होते. 2003 मध्ये जॉनी वॉकर यांनी जगाचा निरोप घेतला. आता विजय कुमार यांनी जगाला अलविदा म्हटले.

टॅग्स :जॉनी वॉकर