बॉलिवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्रा (Priyanka Chopra) व तिचा पती निक जोनास (Nick Jonas)यांच्यात बिनसल्याची चर्चा सुरू झाली, तशी पीसी ट्रेंडमध्ये आली. प्रियंकाने इन्स्टाग्रामवरून सासरचं जोनास हे आडनाव गाळलं आणि ते पाहून प्रियंका व निक घटस्फोट घेणार अशी चर्चा सुरू झाली. अर्थात प्रियंकाची आई मधू चोप्रा यांनी लगेच पुढे येत, या चर्चा निव्वळ अफवा असल्याचं स्पष्ट केलं. घटस्फोटाच्या चर्चा जोरात असताना ‘ जोनास ब्रदर्स फॅमिली रोस्ट’ (Jonas Brothers Family Roast )या शोचा एक व्हिडीओ प्रियंकाने शेअर केला आहे. या व्हिडीओत प्रियंका स्टेजवर असून पती निकची जोरदार खिल्ली उडवताना दिसतेय. अगदी निकला ‘बच्चा’ म्हणत तिने त्याला रोस्ट केलं आहे.घटस्फोटाच्या चर्चांवरही अप्रत्यक्षपणे ती बोलताना दिसतेय. ‘मला दुस-या कोणाच्या मुलाचा सांभाळ करायचा नाही. माझ्या म्हणण्याचा अर्थ मला अन्य कुणाशी लग्न करायचं नाही,’असं ती म्हणतेय.
व्हिडीओत ती म्हणते, ‘आज रात्री मी इथे आहे त्याचे कारण माझा पती निक जोनास आणि त्याच्या भावाला मी रोस्ट करणार आहे. मला कधीकधी निक जोनसच्या भावांची नावदेखील आठवत नाही. मी एक भारतीय मुलगी आहे. भारत हा एक असा देश आहे जो संस्कृती, संगीत आणि मनोरंजन या सर्वच क्षेत्रात समृद्ध आहे. त्यामुळे जोनस ब्रदर्स हे त्या ठिकाणी काहीही करु शकले नाहीत. निक जोनस आणि माझ्यात तब्बल 10 वर्षांचा फरक आहे आणि त्याला 90 च्या दशकातील पॉप संस्कृतीबद्दल काहीही कळत नाही. पण मला ती कळते. म्हणून मग मी त्याला ती समजावून सांगते. यातून एक गोष्ट चांगली घडते ती म्हणजे आम्ही दोघं एकमेकांना शिकवत असतो. अनेकदा निक मला टिक टॉक कसा वापरायचा हे शिकवतो आणि मी त्याला यशस्वी अभिनय कारकिर्दीसाठी काय करावं लागतं हे शिकवत असते’
काल-परवा सोशल मीडियावर प्रियंका आणि निकमध्ये काहीतरी बिनसल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. प्रियंकाने इन्स्टावरून अचानक जोनास हे सासरचं आडनाव हटवलं होतं यामुळे चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. प्रियंका निकपासून वेगळं होण्याचा निर्णय तर घेत नाहीय ना? असा प्रश्न चाहत्यांना पडला होता. पण आता ‘द जोनस ब्रदर्स फमिली रोस्ट’ या शोला प्रमोट करण्यासाठीच तिने तिचं जोनास हे आडनाव हटवल्याचं बोललं जातेय. हा रोस्ट बेस्ड शो असून मंगळवारी २३ नोव्हेंबरपासून ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला आहे.