बॉलिवूडचा ‘दबंग’ खान सलमान खान पुन्हा गोत्यात सापडला. होय, मुंबईच्या डीएन नगर पोलिस ठाण्यात एका पत्रकाराने सलमानविरोधात लेखी तक्रार दाखल केली आहे. फोन हिसकावून गैरवर्तन केल्याचा आरोप सलमानवर ठेवण्यात आला आहे. अशोक श्याम लाल पांडे असे सलमानविरोधात तक्रार दाखल करणा-या पत्रकाराचे नाव आहे. विशेष म्हणजे, या तक्रारीनंतर सलमानच्या सुरक्षारक्षकानेही एक समांतर तक्रार दाखल करत, संबंधित पत्रकारावर सलमानचा पाठलाग करून विना परवानगी व्हिडीओ शूट केल्याचा आरोप केला आहे.
काय आहे प्रकरणबुधवारी संध्याकाळी ४.४०च्या सुमारास सलमान आणि त्याचे काही बॉडीगार्ड जुहू रस्त्यावर सायकलिंग करताना दिसला. सलमानला दिवसाढवळ्या मुंबईच्या रस्त्यावर सायकलिंग करताना पाहून अनेकांना कुतूहल वाटले. संबंधित पत्रकार व त्याचा कॅमेरामॅन याच मार्गावरून जात असताना त्यांना सलमान सायकलिंग करत असताना दिसला. यानंतर त्यांनी सलमानचा व्हिडीओ शूट करण्याचा प्रयत्न केला. पण त्यांना व्हिडीओ शूट करताना पाहून सलमान भडकला आणि त्याने संबंधित पत्रकाराचा मोबाईल हिसकावून घेतला. काही वेळाने सलमानच्या बॉडीगार्डने त्यांना हा मोबाईल परतही केला. हे प्रकरण इथेच शांत झाले असे वाटत असताना श्याम लाल पांडे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ‘सलमान एक सेलिब्रिटी आहे आणि या नात्याने कुणाच्या गाडीत हात टाकून तो मोबाईल हिसकावू शकत नाही. त्यामुळे त्याच्याविरोधात कारवाई करावी,’ असे त्यांनी या तक्रारीत म्हटले आहे.
सलमानच्या बॉडीगार्डनेही या प्रकरणासंदर्भात एक तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीत सलमानचा पाठलाग करण्याचा आणि विना परवानगी व्हिडीओ शूट केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे.